कोणी मैत्रीच करत नाही माझ्याशी! मी वाईट आहे का?

-डॉ. वैशाली देशमुख

( बालरोगतज्ज्ञ आणि किशोरवयीन मुलांविषयीच्या अभ्यासक )

vrdesh06@gmail.com

 Image: freepik

शाळेची मधली सुट्टी झाली. सगळी शाळा एकदम दंगा करायला लागली. दप्तरातून डबे बाहेर आले. आपापले गट करून मुलं डबे खायला बसली. पटापटा खाऊन ग्राऊंडवर खेळायलाही जायचं होतं त्यांना. निमानंही आपला डबा काढला. आपल्या बाकावर बसून ती एकटीच खायला लागली. रोजच्याप्रमाणे आजही तिला वाईट वाटायला लागलं, ‘आपल्याला कुणीच मित्रमैत्रिणी का नाहीत? आपण आवडत नाही का कुणाला? मी उंच नाही, माझं वजन जास्त आहे, म्हणून का? की मी हुशार नाही म्हणून? पण तशा तर कितीतरी मुली आहेत. त्यांना आहेत की मैत्रिणी!’

हेही वाचा!

तुमच्यातल्या कुणाचा ना कुणाचा असा अनुभव असेल. शाळेत असलेला अभ्यास, शिस्त, परीक्षा या सगळ्यावर रामबाण उतारा म्हणजे मित्रमैत्रिणी! पण तेच नसतील तर शाळेची काय मजा! मग स्वत:बद्दल कमीपणा वाटायला लागतो, आत्मविश्वास जातो. काहीवेळा अभ्यासातला रस कमी होतो. क्वचित काही मुलांना शाळेत जाणं नको वाटायला लागतं आणि ती घरीच बसून राहतात. त्यांच्या आईबाबांना खूप काळजी वाटायला लागते त्यांची. त्यावरून काही मुलांचे आईबाबांशी वादही होतात.

 Image: freepik

हेही वाचा!

Image: freepik

 कशी होते मैत्री?

तुमच्या दिसण्यावरून दोस्त मिळतात की वागण्यावरून? बरोबर आहे, सुरुवातीला कुणाच्या दिसण्यावरून तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होतात हे खरंय. पण टिकणारी मैत्री मात्र तुम्ही कसे वागता यावरूनच ठरते. तुम्हाला इतरांची पर्वा आहे का, तुम्ही इतरांना मदत करता का, त्यांना काय वाटतंय हे तुम्हाला समजतं का? की तुम्ही स्वत:पुरतंच पाहता, दुसऱ्यांना त्रास देता, चिडवाचिडवी करता, स्वत:ला फार वरचे समजता? फक्त स्वत:च्या गरजेपुरतं तुम्ही कुणाशी बोललात, तर त्याला किंवा तिला वाटणारच ना की तुम्ही त्यांचा वापर करताय!

कधी कधी काही मुलं कायम मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात असतात, पण आतून जरा दु:खी, एकाकी असतात. कारण त्यांना त्या ग्रुपमधे राहण्यासाठी खूप मनाविरुद्ध वागायला लागतं. मग काय बरं करायला हवं त्यांनी? तुमच्याएवढ्या एका किशोरमित्रानं मला त्याचं मत सांगितलं. तो म्हणाला की खूप तडजोडी करून दोस्त मिळवण्यापेक्षा आपल्या आवडीनिवडी जुळतील असे मोजके दोस्त असणं अधिक बरं, मग ते एक-दोन असले तरी चालतील. तुम्हांला काय वाटतं?

एक सिक्रेट आहे दोस्त मिळवण्याचं. आपले मित्रमैत्रिणी जसे असावेत असं तुम्हाला वाटतं ना, तसं आपण बनायचं. मग बघा काय जादू होईल!

आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा...  तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया.. 

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact