– अभिजित निंबाळकर

Image: wikimedia
घरात बसून बसून कंटाळा आला असेल तर एक भन्नाट खेळ खेळायला चला बाहेर पडा. हा खेळ म्हणजे विटी- दांडू. या खेळाचं नाव बहुतेकांनी ऐकलेलं असतं, पण तो खेळायचा कसा? हे मात्र माहीत नसतं. विटी दांडू म्हणजे खास लाल मातीतला खेळ. गावातली मुलं मुली हा खेळ खेळतात. हा खेळ भारतात सर्वत्र खेळला जातो. महाराष्ट्रात तर या खेळाला फार जुनी परंपरा आहे. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जात होता.
हेही वाचा!
उन्हाळ्याच्या सुटीत विटी दांडू खेळणं हा आमचा आवडता खेळ होता. आम्ही २-४ मित्र मैत्रिणी जमलो की आमच्या घराच्या अंगणामध्ये किवा जवळील मैदानात जावून हा खेळ खेळायचो. हा खेळ खेळण्यासाठी लागतात फक्त दोन गोष्टी. एक म्हणजे दांडू आणि विटी. आम्ही एक लाकडी दांडू (दांडू हा बहुतेक वेळूच्या काठीचा असयचा) आणि लाकडापासून तयार केलेली विटी या गोष्टी घ्यायचो.
विटी दांडू खेळताना झाडाचे लाकूड दांडू स्वरूपात वापरायचो आणि विटीसाठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने तासून टोक करून घ्यायचो जेणेकरून टोकावर फटका मारला कि विटी हवेत उडेल. आपण पेन्सिलीला कसं टोक करतो तसं टोक विटीला दोन्ही बाजूने करावं लागतं.
या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ खेळण्यासाठी खेळाडूंच्या संख्येचं बंधन नसतं. खेळात खूप खेळाडू सहभागी होऊ शकतात. नाही तर अगदी दोघांमध्येही हा खेळ खेळता येतो. इतकंच कशाला आपलं दांडूने विटी मारण्याचं कौशल्य वाढवायचं असेल तर अगदी एकट्याने देखील हा खेळ खेळता येतो.
विटी -दांडू कसा खेळणार?
आता खेळ म्हटल की पहिलं कुणावर राज्य हे तर ठरवलंच पाहिजे. मग त्यासाठी आम्ही एखादी चपटी दगडाची खापरी घेवून ओली सुखी करायचो. म्हणजे खापरीला एका बाजूने थुंकी लावून ती ओली करायचो आणि हवेत उडवायचो. म्हणजे आपला टाॅस करायचो. जो खेळाडू किवा टीम हा टाॅस जिंकेल तो पहिल्यांदा खेळेल असा नियम.
जमिनीवर छोटासा खड्डा खोदून त्यावर विटी ठेवायची. विटी साठी केलेल्या खड्ड्याला गल किंवा गली म्हणतात. एक खेळाडू छोट्या खड्यावर आडवी विटी ठेवून खड्यामधून विटी दांडूने दूर ढकलतो त्या वेळेस बाकीचे सर्व खेळाडू मैदानात विटी झेलण्यासाठी उभे असतात.जर कोणत्याही खेळाडूने विटी झेलली तर विटी मारणारा खेळाडू बाद होतो. विटीचा झेल घेता आला नाही,तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने पुन्हा राज्य घेवून विटीने गुण मिळवायचे.
यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर उडवत राहायची. विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणं हे या खेळातलं सगळ्यात मोठं कसब असतं.त्यानंतर दांडूच्या सहाय्याने विटी बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे दूर भिरकवायची. ती जिथे पडेल तिथे जाऊन पुन्हा ती दूर भिरकवायची. तिथून पुन्हा त्या खेळाडुंनी विटी फेकायची जर विटी दांडूला लागली तर खेळाडू बाद होतो.

Image: mahendraindianews
( लेखक ‘ब्लाॅगर आहेत.)
abhijeetn07@gmail.com
गुण कसे मोजायचे?
या खेळामधली गंमत म्हणजे खेळाडू विटी घेऊन दांडूने फटके मारत जातो . विटी जिथे पडली ते आणि गलमधलं ( विटीसाठी केलेल्या खड्डा) अंतर मोजलं जातं. आणि त्या अंतराच्या प्रमाणात गुण मोजायचे असतात. विटी एकदाच मारली, तर हे अंतर दांडूने मोजलं मोजायचं. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजायचं आणि जर हवेतल्या हवेत दोनवेळा विटीला उडवलं असेल तर विटीने मोजायचं. साहजिकच ज्याचं कौशल्य जास्त असेल त्याचे गुण जास्त होतात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact