आईच्या जुन्या साड्या मिळवा आणि स्पेशल पांघरुण तयार करा!

image : freepik

तुम्हाला शिवता येतं? म्हणजे असं भारी काहीतरी नाही, पण निदान साधा धावदोरा घालता येतो का? बऱ्याच शाळांमध्ये शिवणकाम हा एक विषय असतो. त्यात अगदी साधा धावदोरा, काजं बटणं करणे अश्या साध्या गोष्टी शिकवतात. त्या तुम्हाला येत असतील तर फारच छान. जर नसतील, तर आई / आजी / ताई / वहिनी / आत्या / मावशी यांच्यापैकी जिला वेळ असेल आणि जी तुम्हाला भाव देईल तिच्याकडून साधा धावदोरा कसा घालायचा ते समजून घ्या. ते झालं, की पुढच्या अवघड भागाकडे वळूया.

आईकडून तिची जुनी सुती साडी मिळवायची. हे काम वाटतं तितकं सोपं नाही. विशेषतः वाळवणं घालायच्या दिवसात जुन्या साड्यांना सोन्याचा भाव असतो. पण तुम्ही जर चांगले वागलात, आईची काही कामं केलीत, पापड गच्चीत वाळायला घातलेत आणि ते न खाता इमानदारीत राखलेत, तर आई तुम्हाला उदार होऊन एखादी जुनी साडी देईल. मग ती स्वच्छ धुवून घ्यायची. वाळवायची. तिला इस्त्री करायची.

हेही वाचा!

हारण्या- जिंकण्यापेक्षा खेळण्याचा आनंद देणारा विटी दांडूचा खेळ तुम्हाला खेळता येतो का?

image : freepik

मग त्या साडीची मधोमध घडी करायची. आणि मग साडीचे ते दोन पदर धावदोरा घालून एकमेकांना शिवून टाकायचे. कसे? तर आधी चारही बाजूंनी धावदोरा घालायचा. त्याला मध्ये मध्ये उलटी टीप घाला म्हणजे दोरा ओढला जाणार नाही. चारही बाजूंनी टीप घातली की मग आतला भाग पण शिवायचा. म्हणजे त्याचा गोळा होत नाही. आतला भाग तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा शिवू शकता. एकाच्या आत एक असे परत चौकोन घाला किंवा एक मोठ्ठा क्रॉस काढा किंवा इतर कुठल्याही प्रकारे तिथे शिवण घाला.

समजा आई फार साड्या नेसत नसेल तर? तर तिच्या ड्रेसवरच्या जुन्या कॉटनच्या दोन ओढण्या घ्यायच्या. आणि त्या नीट टोकं जुळवून एकमेकांना शिवून टाकायच्या.

image : google

हे सगळं शिवून झालं की तुमच्याकडे जगातलं सगळ्यात भारी पांघरूण तयार असेल. हे पांघरून उन्हाळ्यात गार राहतं, अंगावर घ्यायला मऊ असतं, त्याची घडी लहान होते त्यामुळे तुम्ही ते कुठेही प्रवासाला नेऊ शकता, थंडीत ते घोंगडी / दुलई / कांबळ्याला आतून जोड म्हणून वापरू शकता.

आणि सगळ्यात भारी म्हणजे हे पांघरूण फक्त आईचं आणि तुमचं असतं. कारण साडी तिची आणि मेहनत तुमची!

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact