
Image: pinterest
'घरात सगळीकडे पसारा करू नको रे.' हे वाक्य तुम्ही आजवर किती वेळा ऐकलंय? रोज किमान दोनदा? आता तर काय सुट्याच आहेत म्हणजे आपण काहीही केलं तरी आई बाबांना पसारा वाटण्याची शक्यताच जास्त त्यामुळे हे वाक्य आता आपल्याला खूप वेळा ऐकावं लागू शकतं. आपण कुठेही बसून काहीतरी खेळलो, किंवा एखादं हस्तकलेचं काम केलं किंवा चित्र रंगवलं किंवा इतर काहीही केलं की तिथे आपोआपच पसारा होतो. तो काही आपण मुद्दाम करत नाही. पण तो होतो तर खरंच. अर्थात तो पसारा आहे असं आईबाबांचं म्हणणं असतं. आपल्या दृष्टीने तो खेळ किंवा रंगच असतात. पण ते बरोब्बर कोणाच्या तरी पायाने सांडतात आणि मग चारही बाजूंनी आपल्या नावाने आरडाओरडा होतो. त्यावर उपाय काय? तर आपलं काम किंवा खेळणं झाल्याबरोब्बर तो सो कॉल्ड पसारा उचलून टाकायचा, सगळं सामान आवरून ठेवायचं आणि ती जागा स्वच्छ चकाचक करून ठेवायची. हे काहीही जमणार आहे का आपल्याला? तर नाही! मग काय रोज बोलणी खायची? तर तेही नाही! मग करायचं काय?
हेही वाचा!
घरात करा आपला कोपरा
आपल्या पसाऱ्याचा घरातल्या इतरांना त्रास होवू नये आणि सतत पसारा आवरण्याचं टेन्शन नको म्हणून आपल्या घरात आपला स्वतःचा असा एक कोपरा बनवायचा आणि सगळा पसारा तिथेच घालायचा. पण, तो कोपरा काही साधासुधा ठेवायचा नाही. तो कोपरा मस्त डेकोरेट करायचा. हा कोपरा हॉलमधला असू शकतो, गॅलरीतील असू शकतो किंवा कुठलाही असू शकतो. तो आधी मस्त तुम्हाला पाहिजे तसा डेकोरेट करा. त्यासाठी तिथे तुमच्या नेहेमी लागणाऱ्या वस्तू नीट रचून ठेवा. एखादी मस्त झाडाची कुंडी ठेवा. एखादं छोटं शेल्फ जर तुम्हाला मिळालं तर त्यात तुमच्या वस्तू ठेवा. आणि मग तुमच्या सगळ्या गोष्टी तिथेच बसून करा. पण… तो कोपरा असा भारी डेकोरेट करा की त्याकडे बघून मोठ्या माणसांना पण तिथे येऊन बसावसं वाटलं पाहिजे. कारण किती झालं तरी ‘आपण आपण आहे!’

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact