- राजीव तांबे
प्रत्येकांच्या घरात एक सूक्ष्मदर्शक यंत्र असतंच पण ते कोणी वापरतंच नाहीत. ते वापरण्यासाठी अजिबात पैसे खर्च करावे लागत नाहीत किंवा त्याची काळजी घेण्यासाठी काही विकत ही आणावे लागत नाही. खरं म्हणजे अनेकांना माहितंच नाही की आपल्या घरातल्या फळीवर आपणंच एक सूक्ष्मदर्शक यंत्र ठेवलेलं आहे.

या घरातल्या सूक्ष्मदर्शक यंत्रांने काय काय पाहता येईल..
- छोटी मुंगी किंवा इटुकला डास दहापट मोठा करून पाहताना त्यांची शारीरिक रचना समजून घेता येईल.
- वेगवेगळ्य फुलांच्या पाकळ्यांवरच्या सूक्ष्म रेषा अगदी स्पष्ट पाहताना हे ही लक्षात येईल की, प्रत्येक फुलावरच्या प्रत्येक पाकळीवरच्या रेषा अगदी वेगळ्याच आहेत.
- चष्मा हरवला तर वर्तमानपत्रातील बारीक अक्षरं मोठी करून आरामात वाचता येईल.
खरंतर ही यादी खूप वाढवता येईल.
हेही वाचा…
एक फोटो खूप काही सांगतो! विहानने काढलेल्या फोटोने वेधलं जगाचं लक्ष!
हां तर आता घरातली एक काचेची गोल बाटली घ्या (सुमारे १० इंच ऊंच असेल अशी)
ही बाटली पाण्याने काठोकाठ भरा. बाटलीत अजिबात हवा राहणार नाही याची काळजी घ्या. मग झाकण घट्ट बंद करा.
झाले आपले सूक्ष्मदर्शक यंत्र तयार. आता वर्तमानपत्रावर बाटली आडवी ठेवा..पाहा काय दिसतं?
असं का होतं?
मध्यभागी फुगीर आणि कडेला निमुळते होत गेलेले भिंग हे बहिर्गोल भिंग असते. या भिंगामुळे सरळरेषेत जाणारा प्रकाशकिरण वाकवला जातो. आणि हे बहिर्गोल भिंग प्रकाशकिरण एकत्रित करते. पण भिंगाच्या मध्यातून जाणारा किरण मात्र वाकत नाही. तो सरळ रेषेत आरपार जातो. बहिर्गोल भिंगातून वस्तूची प्रतिमा मोठी दिसते.
या ठिकाणी पाण्याचा थेंब हा बहिर्गोल भिंगासारखा असतो. त्यामुळे पाणी भरलेली गोल बाटली जर कशावर ठेवली तर पलीकडचं सर्व मोठं दिसतं.
मग.. आता काय-काय मोठं दिसतंय?
तुम्ही काय-काय छोट्याचं मोठं पाहिलंत ते मला कळवाल? मी तुमच्या ‘छोट्या-मोठ्या पत्रांची’ वाट पाहतोय.
‘छोट्या गोष्टी मोठ्या करुन पाहताना आपण छोट्या-छोट्या पण अनेक मोठ्या गोष्टी शिकत असतो’ ही हुनान प्रांतातील चिनी म्हण लक्षात ठेवा.


