स्वयंपाकघरातली लुडबुड
-वैभव भाल्डे

फिंगर, बॉबी किंवा पोंगा पंडीत काहीही म्हणा, पिवळ्या धमक रंगाचे हे टाइमपास खाणे न आवडणारा विरळाच नं? बसल्या बसल्या किती फस्त होतात समजतही नाही. यांचेच आणखीन चविष्ट रूप म्हणजे फिंगर चाट. हेही खायला तुम्हाला नक्की आवडेल बघा! हा पदार्थ बनवतानाही खूप मजा येते. यासाठीची साहित्य आणि कृती समजून घ्या. त्यात अवघड असं काहीच नाही!
साहित्य - फिंगर अर्थातच पोंगे, उकडलेल्या बटाट्याचा लगदा, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट,साखर, मीठ, चाट आणि मसाला बारीक शेव घ्यावी
कृती- उकडलेल्या बटाट्याचा लगदा एका कुंड्यात घ्या, त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तसेच चवीनुसार साखर, तिखट, मीठ व चाट मसाला मिसळा. सगळे छान एकत्र कालवून घ्या. तयार मसाला फिंगर मध्ये भरा. दोन्ही बाजूने मसाल्याला बारीक शेव लागेल असे शेवेत फिंगर घोळवून घ्या. फिंगर चाट खायला व खाऊ घालायला तयार!!
बटाटे उकडणे, साली काढून कुस्करणे वा कांदा टोमॅटो वगैरे बारीक चिरणे ह्या गोष्टी मोठ्यांच्या मार्गदर्शना खाली करा .
हेही वाचा!
जगात पहिलं दही कसं लागलं असेल?
खायच्या खूप आधी हे फिंगर चाट बनवू नका. कारण ते मऊ पडतात सगळा मसाला तयार असला तर वेळेवर पटापट भरून खाता येतील! आजकाल नाचणीचे वा इतरही वेगवेगळे नळी आकाराचे कच्चे फिंगर मिळतात, ते आणले तर आधी घरातील मोठ्यांकडून तळून घ्यावे लागतील. बदल म्हणून व पोषणमूल्य वाढवायला गाजर वा बीटचा वाफवलेला कीस, कुस्करलेला पनीर वगैरे मिसळून बघा, तेही आवडेल. बघा बनवून नी खाऊन ! कसे वाटले हे सांगायला अजिबात विसरू नका!
( लेखक 'मुंबई स्वयंपाकघर फेसबुक ग्रुप सदस्य आहेत)


