
गणित विज्ञान हे स्कोअरिंगचे विषय… इंग्रजी यायलाच हवं… म्हणून हे विषय घोकून घेतले जातात. तशी तयारी इतिहास भूगोलाची करा म्हणून कुणी मागे लागत नाही, पण या दोन विषयांत चांगले मार्क मिळाले नाही तर ‘टक्केवारी’ खाली येते. त्यामुळे यांचाही अभ्यास व्यवस्थित करावा लागतो.
मग तो कसा करायचा?
१ . पुस्तकातले धडे जास्तीत जास्त वेळा न कंटाळता वाचणं हे या प्रश्नाचं पहिलं आणि महत्त्वाचं उत्तर! सहसा या दोन्ही विषयांच्या पेपरमध्ये पुस्तकातले, धड्यांखालचेच प्रश्न असतात. त्यामुळे पुस्तक नीट, न कंटाळता वाचलेलं असेल तर हे दोन्ही विषय तुम्हाला अवघड जाणार नाहीत.
२. दुसरं म्हणजे इतिहास-भूगोलातल्या संकल्पना - कॉन्सेप्ट्स तुम्हाला समजून घ्यायला हव्यात. उदाहरणार्थ भूगोलाचा अभ्यास करताना त्यात असलेले प्रदेश, त्यांची वैशिष्ट्य, भूरूपांचे प्रकार हे नीट समजलं तर परीक्षेला बसल्यावर उत्तरं लिहिणं सोपं होतं.
३. उत्तरं लिहिताना त्या त्या संकल्पनांसाठी असलेले विशिष्ट तांत्रिक शब्द तुम्ही वापरायलाच हवे, म्हणजे ते शब्द लक्षात राहायला हवे आणि त्यासाठी पुन्हा तुम्ही पुस्तक नीट, काळजीपूर्वक वाचलेलं हवं.
हेही वाचा!
अचानक तुमच्यासमोर संकट उभं राहिलं तर तुम्ही काय कराल?
४. भूगोलात नकाशावरचे प्रश्नही असतात. उदा. भारताचा नकाशा दिला आणि त्यात काही ठिकाणं दाखवा असं सांगितलं असेल तर पुस्तकातल्या नकाशांचं तुम्ही केलेलं निरिक्षणच तुम्हाला उपयोगी पडणार आहे, हे लक्षात ठेवा.
५. इतिहास म्हणजे सगळं जुनं, घडून गेलेलं… कुठल्या राजाने काय केलं, कुठल्या राणीने कुठल्या देशावर किती वर्षे राज्य केलं वगैरे वगैरे. सनावळ्याही महत्त्वाच्या. इतिहासाच्या पुस्तकातले धडे हे सहसा गोष्टी सांगितल्यासारखेच लिहिलेले असतात. त्यामुळे ते वाचताना मजा येऊ शकते आणि अभ्यासही होऊन जातो.
पुस्तक बारकाईने वाचलं असेल तर इतिहासाचा वेगळा अभ्यास करायला लागत नाही. त्यामुळे परीक्षेच्या तयारीला लागताना वाचनावरच भर द्यायला हवा, हे नक्की!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


