अभ्यास सगळा झालाय, पण आता पेपरच्याआधी ‘रिव्हिजन’ कशी करायची?

Image: freepik

परीक्षेआधी सगळा अभ्यास झालेला असतो. पण प्रत्येक पेपरच्या आधी सर्व अभ्यासाची पुन्हा रिव्हिजन होणं गरजेचं असतं. कमी वेळात ही अभ्यासाची उजळणी संपवायची असते. पूर्ण पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचून काढणं म्हणजे रिव्हिजन नव्हे. रिव्हिजन करण्याचं विशिष्ट तंत्र आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाची रिव्हिजन करायची पध्दतही वेगळी असू शकते. पण तरी, या काही टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.

पेपरच्या आधी रिव्हिजन कशी करायची?

  • परीक्षेला सहसा पुस्तकाबाहेरचं काहीही विचारलं जात नाही. त्यामुळे धडे, धड्याखालची प्रश्नोत्तरं वाचणं ही एक चांगली रिव्हिजन असू शकते.रिव्हिजन करताना एखादी पेन्सिल हातात असू द्या. पेन्सिलने महत्त्वाच्या मुद्दयांवर एखादी खूण करा आणि आता तेवढाच मजकूर पुन्हा परीक्षेला जाताना नजरेखालून घालायचा आहे, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे अभ्यासाचा पुढचा टप्पा सोप्पा होईल .
  •  मित्रमैत्रिणींबरोबर रिव्हिजन करत असाल तर आपल्याला नीट येणारा मुद्दा दुसऱ्यांना समजावून सांगितला तरी पक्का होऊ शकतो. असं केल्यामुळे सगळ्यांचाच अभ्यास छान होईल आणि सगळ्यांनाच उपयोग होईल.
  • उजळणी करताना नुसती प्रश्नोत्तरं, धडे एवढंच करणं पुरेसं नाही. शुद्धलेखन, स्पेलिंग्ज, वाक्यरचना यांकडेही आपलं लक्ष हवंच, म्हणजे मार्क कापले जाणार नाहीत.

हेही वाचा!

परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचेय मग अभ्यासासोबत रोज व्यायामही करा!

  • प्रत्येक प्रकारातलं एखादं गणित सोडवून बघायला हरकत नाही. पाच किंवा दहा मार्कांसाठी विचारलं जाणारं प्रत्येकी एक एक गणित पक्कं केलं तर त्याचा उपयोग नक्की होईल.
  •  भूगोल, विज्ञान अशा विषयांची उजळणी करताना सूत्र पाठ करणं, आकृत्या काढून बघणं अजिबात विसरायचं नाही, कारण हे मार्क हक्काचे असतात, नीट तयारी केली असेल तर अचूक आकृत्या काढून पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात. आकृत्या काढणं, नकाशे भरणं अशा गोष्टी केल्या तर त्यातून आपल्या मेंदूलाही थोडा ब्रेक मिळू शकतो.

Image: freepik

  • उजळणी करणं हा कंटाळवाणा कार्यक्रम असता नये, त्यामुळे तासंतास पुस्तक-वहीत तोंड घालून बसायचं नाही. अधूनमधून थोडा ब्रेक घ्यायचा. ब्रेकमध्ये काय करता हे मात्र महत्त्वाचं आहे, केलेल्या अभ्यासाचा विसर पडेल अशी कुठलीही गोष्ट, उदा. मोबाईल, टीव्ही या गोष्टी टाळायच्या.
  •  त्याऐवजी मोकळ्या हवेत चालणं, आईबाबांशी गप्पा, एखादी छोटीशी चक्कर मारुन येणं करु शकता.
  • या ब्रेकमध्ये अभ्यासाला बसताना खायला छोटासा खाऊही तुम्ही तुमच्या हाताने करुन घेऊ शकता. त्यामुळे पुन्हा फ्रेश मनाने अभ्यासाला बसायला तुमचा मेंदू आणि पोटही उत्साहाने तयार होईल.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact