
शाळेत, क्लासेसमध्ये खूप अभ्यास होतो. पण घरी आल्यावरही अभ्यास करावाच लागतो. परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास करणं गरजेचाच असतो. पण अनेकदा अभ्यास करायला बसलं की कंटाळा येतो. किंवा अभ्यासच करावासा वाटत नाही. आणि जरी अभ्यासला बसलं तरी लक्ष लागत नाही. अभ्यास करता करता लक्षात येतं की तासनतास आपण एकच पान वाचतोय पण लक्षातच राहात नाही. अशा वेळेस समजावं की आपल्या मेंदूला व्यायामाची गरज आहे. व्यायाम केल्याने अभ्यास चांगला होतो आणि त्याचा परिणाम परीक्षेतील मार्कांवरही होतो. व्यायाम आणि त्यामुळे अभ्यासात येणारं यश यावर अभ्यास आणि संशोधन झालं आहे. त्यातून हे सिध्द झालं आहे की व्यायामाने मेंदूला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मनावर आलेला ताणही निघून जातो.
हेही वाचा!
अभ्यासाचा कंटाळा येतो. एवढा अभ्यास करण्याची खरंच गरज असते का?
व्यायाम केल्याने अभ्यास कसा सुधारतो?
- व्यायाम केल्याने मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो.. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगचा अभ्यास सांगतो की एरोबिक्स व्यायाम केल्याने मेंदूला ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वं मिळतात. त्यामुळे मेंदूचं कार्य सुधारतं. व्यायामाने मज्जापेशींच्या निर्मितीला हातभार लागतो. यामुळे मेंदूत नवीन मज्जातंतू किंवा चेतापेशी निर्माण होतात.
- व्यायाम केल्याने न्यूरोट्रान्समीटर्स प्रवाहित होण्यास उत्तेजन मिळतं. व्यायाम करताना डोपामाइन, सेरोटेनिन ही रसायन स्त्रवण्यास उत्तेजन मिळते. यामुळे मेंदूतील पेशींची वाढ होते.
- मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्स उद्दीपित झाल्याने ग्रहण केलेली माहिती अल्पकालीन स्मृतीतून दीर्घकालीन स्मृतीत साठवण्यास मदत होते.
- मज्जातंतूंची जोड मजबूत होते. मेंदूची लवचिकता वाढते. त्यामुळे मेंदूची शिकण्याचे, जे शिकतोय ते आत्मसात करण्याची क्षमता वाढते.
- व्यायामाने स्मरणशक्ती वाढते. मेंदूचं संज्ञात्मक कार्य वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणजे अभ्यासातली प्रगती वाढते.
व्यायाम कोणता आणि किती करावा?
- अभ्यासासाठी मेंदूला चालना मिळावी म्हणून २० मिनिटं व्यायाम करणं पुरेसं आहे. हा व्यायाम करताना ऊर्जा मिळवणं हाच उद्देश असावा. त्यामुळे थकण्यापर्यंत व्यायाम करु नये. अभ्यासाला बसण्याआधी व्यायाम करावा किंवा अभ्यास करताना मन प्रफुल्लित होण्यासाठी मध्ये व्यायाम करावा.
- परीक्षा आहे म्हणून व्यायामाला सुटी देऊ नये. उलट पेपरला जाण्याआधी व्यायाम करावा. यामुळे मन शांत होतं. पेपर लिहिताना आठवण्याची क्षमता वाढते. आणि वेळेत प्रश्नपत्रिका सोडवण्याकडे लक्ष केंद्रित होतं.
- घराच्या बाहेर पडून पाॅवर वाॅक किंवा बाहेर जाऊन जाॅगिंग करावं. बाहेर जाऊन व्यायाम केल्यानं मेंदूंला ताज्या हवेतून ऑक्सिजन मिळतो.
- अभ्यासामुळे आलेला ताण, थकवा घालवण्यासाट्ही सकाळी योगासनं करावीत. योगचा सराव किंवा सूर्यनमस्कार घातल्याने मन आणि शरीर शांत होतं. रक्ताभिसरणं वाढतं. श्वासाचे व्यायाम केल्याने मानसिकरित्या छान वाटतं. आपल्या शरीराला आराम देणारी शरीरातील व्यवस्था व्यवस्थित काम करते.
- मन लावून चांगला अभ्यास करण्यासाठी, परीक्षेत प्रश्नपत्रिका नीट सोडवण्यासाठी मेंदूचं कार्य उत्तम चालणं गरजेचं आहे. व्यायाम केल्याने मेंदू चांगलं काम करतो. त्यामुळे उत्तम गुण मिळवायचे असतील तर अभ्यासासोबत व्यायामही रोज करा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


