
खरंतर विज्ञान हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. तरीही अनेकांना अभ्यासातलं विज्ञान बोअर वाटतं, कोणाला अवघड वाटतं तर कोणाला या विषयाचा अभ्यास करण्याचाच कंटाळा येतो. पण विज्ञानाच्या अभ्यासातला कंटाळा, अवघडपणा हा अभ्यास करुनच घालवता येतो. विज्ञानाचा अभ्यास करण्याची एक विशिष्ट पध्दत आहे. आपण जसा इतिहास, भूगोलाचा अभ्यास करतो त्याच पध्दतीने विज्ञानाचा अभ्यास करुन चालत नाही. कायो करायचं नक्की?
१. विज्ञानाचा अभ्यास करताना आधी पाठांतरावर फुली मारा. विज्ञानाच्या धड्यांमधल्या मूळ संकल्पना समजून घ्या. विज्ञानाचा अभ्यास हा पाठांतराने नाही तर विशिष्ट तंत्राने होतो.
२. आधी वर्षभर आपण विज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, शिक्षकांनी नोटस दिलेल्या आहेत. आपण वेळच्यावेळी धड्याखालचे स्वाध्यायही सोडवलेले आहेत. तरीही परीक्षेची तयारी करताना सर्वात आधी विज्ञानाचा प्रत्येक धडा बारकाईने नीट वाचा. विज्ञानाचे अनेक धडे मोठे असतात. मोठ्या धड्यांचा एकदम अभ्यास केला तर गोंधळ उडू शकतो. तेव्हा मोठ्या धड्यांचा अभ्यास करताना त्या धड्याचे छोटे छोटे भाग करा. रोज ठरवल्यानुसार धड्याचा त्या त्या भागाचा अभ्यास करा.
३. वाचणं, समजून घेणं या गोष्टी विज्ञानाच्या अभ्यास करताना करायलाच हव्यात. शिवाय आपण आपल्या नोटसही काढायला हव्यात. धड्यात आलेली सूत्रं, व्याख्या लिहून पाहा.
हेही वाचा!
शब्द सारखे पण अर्थ वेगळा.. शब्दांचा असा खेळ खेळून तर पाहा!
४. विज्ञानाच्या अभ्यासात तक्ते, आवृत्त्या फार महत्त्वाच्या असतात. त्याचा सराव करा. विज्ञानाचा पेपर सोडवताना जिथे आवश्यक आहे तिथे आकृत्या काढणं,आकृत्यांना व्यवस्थित नावं दिलेली असणं यामुळे पेपरचं प्रेझेन्टेशन छान होतं. आणि त्यामुळे मार्क्सही छान पडतात.
५. धड्याखालचे स्वाध्याय पुन्हा सोडवा. भौतिक शास्त्रात गणितं असतात ती सूत्रांचा वापर करुन सोडून पाहा. रसायनशास्त्रात रासायनिक सूत्रं असतात त्याचा सराव करा. यामुळे आपला किती अभ्यास झाला आहे, आपल्याला काही अडत नाही ना याचा अंदाज येतो.
६. विज्ञानाचा अभ्यास करताना आधी आपण काय अभ्यास केला याचं थोडं चिंतन मनन करा. त्यामुळे झालेला अभ्यास पक्का होतो.
७. विज्ञानाच्या पुस्तकात प्रत्येक धड्यात 'करुन पहा' असतं. हे प्रयोग जरुर करुन पाहा. तो विशिष्ट धडा समजून घेण्यासाठी हे प्रयोग खूप मदत करतात.
८. अभ्यास करताना एखादा मुद्दा कळत नसला तर तो वेळेत शिक्षकांकडून पुन्हा समजून घ्या.
९. धडा वाचताना जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात किंवा अवघड वाटतात ते हायलायटरच्या सहाय्याने रंगवा. त्यामुळे रिव्हिजन करताना त्या मुद्द्यांकडे पटकन लक्ष जातं.
१०. अवघड धडे व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी फ्लॅशकार्डचा वापर करावा. ज्या व्याख्या, सूत्रं, संकल्पना अवघड जातात त्याची फ्लॅशकार्ड केली आणि ती येता जाता पाहिले की लक्षात राहातात. शिवाय अधून मधून फ्लॅशकार्डचा क्रम बदला. त्यामुळे क्रमानुसार लक्षात ठेवण्याऐवजी मुद्दे लक्षात ठेवण्याची सवय लागते. आणि परीक्षेतही एखादा मुद्दा न आठवल्यास पुढचं काहीही न आठवण्याचा धोका टळतो.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


