
आपण शॉपिंगला गेलो, मॉलला गेलो की किती प्रकारचं पॅकिंग मटेरियल घरी येतं, ते मोजायचं का?म्हणजे, अगदी एक किलो शेंगदाणे पॅक करायला प्लॅस्टिकची पिशवी वापरलेली असते. एखादी तेलाची कॅन ही कॅन तर असतेच, त्याच्यावरून पूर्ण असं पारदर्शी प्लॅस्टिकचे शीटदेखील त्याला घट्ट चिकटवलेले असते. शर्टाचे, कपड्यांचे पॅकिंग वेगळे असते. भाजी घेतली, तर तिच्या पिशव्या वेगळ्या असतात. घरी आल्यावर त्या त्या वस्तू काढून सगळं पॅकिंग मटेरियल एका बॉक्समध्ये जमा करा. त्यात किती वेगवेगळे प्रकार आहेत, ते तुम्हांला कळेल. बिल फाडतांना तुम्हांला कागदाची किंवा कापडाची वेगळी पिशवी मिळाली असेल, तर ती देखील वेगळी ठेवा. पॅकिंग म्हणून पुठ्ठे, पिना, क्लिप्स, बबल पेपर आलेला असतो. सगळं एकत्र जमा करा. बबल रॅप फोडत बसायला मजा येतेच. ते करता करताच पॅकिंग म्हणून थर्मोकोल आलंय का, पेपरच्या गुंडाळ्या, बोळे बुटांमध्ये येतात, तसे आले आहेत का? फळांच्या पुठ्ठयाच्या/लाकडी खोक्यांसोबत नायलॉन बॅग्स, गवत आलंय का? असं सगळं शोधायला एक डायरी घेऊनच कामाला लागायला लागेल.
एका मॉल खरेदीला गेलं, तर जातांना आपण काय पॅकिंग मटेरियल, पिशव्या आणि सामान नेलं आणि येतांना आपल्यासोबत बिलासकट काय काय आलं, ह्याची यादी करू. एकही वस्तू सोडायची नाही. आता जे काही पॅकिंग म्हणून आलंय, पिशव्यांसकट, ते एकाच खोक्यात जमा केल्यावर आपलं काम संपत नाही. ह्या खोक्यात जे काही जमा झालंय, ते किती प्रकारचं मटेरियल आहे, ते आपल्याला ओळखता येतं का, ते बघायचं.
हेही वाचा!
शू रॅकवर असलेल्या चपला बुटांवर प्रोजेक्ट करावा असं का नाही वाटत तुम्हाला?
उदाहरणार्थ, ज्यूस जर बाटलीत प्यायलो, तर ती बाटली काचेची होती, की टेट्रापॅक होती, ते ओळखता येतं का? की PET प्लॅस्टिक होतं? ज्यूस पिऊन झाल्यावर ही बाटली देखील कचराच बनणार असते. त्यामुळे, पॅकिंगमध्ये तिलाही वेगळं मोजावं लागेल. केक बिस्किट्स, कॅडबरी कशी पॅक होते? एकेका कॅडबरीत काय काय प्रकारचं पॅकिंग मटेरियल असतं? बघू तरी!
कपड्यांचे टॅग असतात, त्याला नायलॉन दोरी असते. तिला पुढे एक ग्लॉसी कागद बांधलेला असतो, ज्यावर माहिती, किंमत छापलेली असते. मग ती दोरी वेगळी जाणार, ग्लॉसी टॅग वेगळा. कधी नायलॉन दोरी ऐवजी साधा जाडसर दोरा असतो. त्याला प्लॅस्टिकचा लहानसा नखाएवढा डबीसारखा तुकडा जोडलेला असतो. दोरा हे मटेरियल वेगळं, ते प्लॅस्टिक वेगळं, टॅगचा कागद वेगळा, कपडा वेगळा. कपड्यांवर काही स्टिकर्स असतात, ती वेगळी. तो कपडा प्लॅस्टिक बॅगेत पुठ्ठयात घालून ठेवतात, ते वेगळं. बिल वेगळं, कपड्याच्या पिना वेगळ्या, बिल झाल्यावर आणखीन एक बॅग/पिशवी येते, ती वेगळी. म्हणजे एका शर्टासोबत काय काय घरात आलं बघा. होऊन जाऊ देत असा एक प्रोजेक्ट. पॅकिंग मटेरियल समजून घ्यायचा आणि त्यांची यादी करायचा.
-प्राची पाठक
prachi333@hotmail.com


