
आपण घरात एखादी चप्पल वापरतो का? पावसाळ्यात वेगळ्या प्रकारचे सँडल्स वापरतो का? शाळेचे, कॉलेजचे काही ठराविक शूज असतात का? एखाद्या फंक्शनला आपण कोल्हापुरी चप्पलसारखं काही घालून जातो का? स्पोर्ट शूज वेगळे असतात का? काय बरं कारण असावी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणांची? पावसाळ्यामध्ये आपण लेदरचे शूज का नाही वापरत? स्विमिंगसाठी जातांना कॅनव्हास शूज घालून जातो का? असा विचार कधी केला आहे? आपले शूज, चप्पल, सॅंडल वगैरे प्रकार आपण किती काळाने आणि कसे स्वच्छ करतो? त्यांना वास येतो म्हणजे काय होतं? कोणत्या विशिष्ट शूजला पॉलिश वगैरे केली जाते? ती कशी करतात? आपले शूज, सँडल्स स्वच्छ-नेटके कसे ठेवतात? त्यांच्या छोट्या-मोठ्या दुरुस्त्या कशा करतात? असाच एक प्रोजेक्ट केला तर....
काय असतं वेस्ट मॅनेजमेण्ट? स्वतः:च्या पुस्तकांचा कप्पा आवरून बघितला तरी कळेल !
एकेक शुज बनवायला किती वेगवेगळे पार्ट्स एकमेकांना जोडायला लागतात, किती वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल त्यात वापरलं जातं, याचा विचार करू. माहिती घेऊ. चांगले ब्रँडेड शूज बनवताना ५० ते ७० वेगवेगळे तुकडे एकमेकांना जोडले जातात. फक्त डिझाईन, शो ह्यापलीकडे सगळ्या तुकड्यांचं काहीतरी प्रयोजन असतं. त्यातून काहीतरी सोय ते शूज घालणाऱ्या व्यक्तीला मिळणार असते. साधं बुटाची लेस बांधायचे सुद्धा किती वेगवेगळे प्रकार आहेत. किमान वेगवेगळ्या प्रकारे लेस बांधायची कला तरी शिकू या. चांगल्या शूजच्या या लेसेस ते शूज वापरून झाल्यावर देखील उत्तम राहतात. शूज खराब झाले म्हणून जर तुम्ही शूज टाकून देणार असाल, तर या लेसेस जरूर काढून ठेवा. त्या अतिशय पक्क्या असतात. त्यांचा वापर वेगवेगळ्या गोष्टी बांधायला घरात, बागेत होऊ शकतो. ट्रेकिंगसाठी दोरखंडाच्या ज्या गाठी शिकवतात, त्या देखील या शूजच्या लेसेसवर प्रॅक्टिस करता येतील. शूजच्या लेसेस घरात खेळायचे वेगवेगळे गेम्स बनवण्यासाठी देखील उत्तम प्रकारे वापरता येतील. वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग बॉल्स टांगून त्यावर क्रिकेटची प्रॅक्टिस करता येईल. बॅडमिंटन शटल देखील अशा प्रकारे ह्या लेसेसला बांधून त्यावर एकट्याने प्रॅक्टिस करायचे विविध गेम्स आपल्याला तयार करता येतील. त्यासाठी फार जागाही लागत नाही. घरात, घराच्या बाहेर थोड्याशा मोकळ्या जागेत देखील तुम्ही हे बनवू शकता आणि त्यावर सराव करू शकता. चपला बुटांपासून सुरूवात करून पर्यावरण भान जपत वेगवेगळे खेळही खेळून होतील.


