– डाॅ. श्रुती पानसे

एखादी क्रिकेटची मॅच चालू आहे आणि आता शेवटचीच ओव्हर राहिली आहे. आपण नक्कीच जिंकणार असं एखाद्या संघाला वाटत असतं. पण म्हणून, आता एकाच ओव्हर राहिली आहे, आता कशाला टाकायचे उरलेले बॉल्स? किंवा कशाला शेवटच्या तीन-चार बॉल मध्ये सिक्स मारण्याचे कष्ट घ्यायचे, असा विचार कोणताही खेळाडू करत नाही. शेवटच्या बॉलपर्यंत ते मेहनत करत राहतात. त्यांनी ठरवलेलं लक्ष्य ते पार पाडतातच.
परीक्षेचा शेवटचा पेपर सुद्धा असाच असतो. अभ्यास करावा ही इच्छा आणि त्यासाठी लागणारं गांभीर्य दोन्ही कुठेतरी निघून गेलेलं असतं. परीक्षेच्या सुरुवातीला जो ताण असतो तो ताण जसजशी परीक्षा पुढे जाते, तसा हळूहळू कमी होतो. आणि शेवटच्या पेपरला तर आता जणू काही सुट्टी लागली आहे अशा पद्धतीने आपल्याला एकदम हलकं हलकं वाटायला लागतं. पण इथेच गडबड होऊ शकते. कारण शेवटचा पेपर सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. त्या पेपरचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावाच लागतो.
जणू काही परीक्षा संपलीच या धुंदीत अभ्यास केला नाही तर नेमकं शेवटच्या पेपरमध्ये अडकायला होईल. आपण अभ्यास केला आहे तो सर्व विषयांच्या परीक्षा देण्यासाठी. त्यामुळे अभ्यासाचा मूड आणावा लागेल.
हेही वाचा!
अभ्यास एकाच जागी बसून करावा.. असा नियम आहे का?
कारण ज्या वेळेला मार्कांची सरासरी होते, तेव्हा सर्व पेपरचे मार्ग ग्राह्य धरलेले असतात. एखाद- दुसऱ्या पेपरमध्ये कमी मार्क मिळाले तर सरासरी कमी होते. त्यामुळे जरी घरामध्ये सहलीचे बेत आखले जात असतील किंवा तुम्ही कुठल्या शिबिराला जाणार त्याचं एक वारं घरामध्ये असेल किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असतील आणि म्हणून वेगळंच वातावरण घरामध्ये असेल, तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या पेपरचा अभ्यास चालू ठेवायला पाहिजे.
कदाचित असं ही होईल की शेवटच्या पेपरचा ताण मुळीच नसल्याने तो अभ्यास एकदमच छान होईल. पेपरही छान जाईल. तणावमुक्त, आनंदी वातावरणात अभ्यास केल्यामुळे परीक्षा कशी छान देता येते, यांचा एक अनुभव आपल्याला मिळेल. आणि मग केवळ शेवटच्या पेपरचा नाही तर प्रत्येक पेपरचा अभ्यास असा छान केला असता तर सगळेच पेपर छान गेले असते हे ही लक्षात येईल. आता तर ही परीक्षा संपली. पुढच्या वर्षीचा परीक्षेचा अभ्यास ही असाच आनंदी वातावरणात केला तर निकाल मस्तच लागेल.
( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)
shruti.akrodcourses@gmail.com


