स्वयंपाकघरातली लुडबुड
- शुभांगी जोशी

लहान माझी बाहुली मोठी तिची सावली . नकटे नाक उडविते घारे डोळे फिरवीते
भात केला, कच्चा झाला वरण केलं, पातळ झालं
पोळ्या केल्या ,करपून गेल्या आडाचं पाणी काढायला गेली
धपकन पडली गंमतच झाली..
काय मंडळी स्वयंपाकघरात लुडबुड करताना मजा येतेय ना तुम्हाला?
स्वयंपाक घरात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतो किंवा काही गोष्टी घडतात. त्याचे वर्णन करण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्याची काही सोपी सोपी उदाहरणे सांगते.
हेही वाचा
दिसायला देखणा, चवीला चटकदार चीज- चेरी -पायनापल
१ दूध: तापवणे, उकळवणे, आटवणे या सर्व क्रिया आपण दुधावर करतो. कधी कधी दूध नासते,फाटते किंवा उतू जाते.
२ भात : भाताची तर खूपच मजा आहे बर का. तांदूळ आणि पाणी यांचे प्रमाण जर बिघडले किंवा कुकरची शिट्टी जास्त किंवा कमी झालीतर काय काय होऊ शकते बघा. भात कच्चा राहतो, फडफडीत होतो, करपतो, किंवा गचगचित होतो. अशा गच्च गच्चीत झालेल्या भाताच्या वर्णनासाठी’ गुरगुट्या’ हे गंमतशीर विशेषण वापरले जाते. तुम्ही जसा स्वयंपाक घरात जास्तीत जास्त वेळ घालवाल तसतसे असे अनेक शब्द तुम्हाला समजत जातील
३ पोळी : पोळी फुगते, करपते, वातड होते ,काही वेळेला कच्ची राहते, गोल व्हायचे ऐवजी वेगवेगळे नकाशे तयार होतात. आहे की नाही मजा !
मंडळी आता काही पदार्थ तुम्हाला देते आहे. हे पदार्थ केल्यानंतर त्यात वरच्या प्रमाणे काय काय होऊ शकते ते तुम्हाला ओळखायचे आहे. तुमचे मित्र मैत्रिणी, घरची मंडळी यांना सोबत घेऊन आपण जी वही केली आहे त्यात याची उत्तरे लिहूयात का ?
१ भाजी २ आमटी ३ कोशिंबीर ४ चटणी ५ सरबतं
( लेखक मुंबई स्वयंपाकघर फेसबुक ग्रुपचे सदस्य आहेत. )
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


