
आपल्या जिभेवर खूप साऱ्या रुचिकलिका असतात. रुचिकलिका याचा अर्थ ज्यामुळे जिभेला चव कळते. या रुचिकलिकांमुळे सतत काहीतरी वेगळं खावंसं वाटतं, ज्या अतिशय आवडीच्या गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा खाव्याशा वाटतात. जेव्हा त्यांना छान खायला मिळतं तेव्हा त्या मेंदूकडे ‘आता माझं समाधान झालं. मला छान वाटतं आहे’ असे संदेश पाठवतात. म्हणून मेंदूसुद्धा ‘आवडेल ते खा’ असं सांगत असतो.
हेही वाचा!
जेवताना मोबाइल बघितलेला चालतो का?
पण इथे प्रश्न असा आहे की रुचीकालिकांना जे आवडतं. ते पोटाला आवडतंच असं नाही. आवडणाऱ्या छान छान गोष्टी नेहमीच पौष्टिक असतील, शरीराला निरोगी ठेवणाऱ्या असतील असं सांगता येत नाही. म्हणून जरी जिभेला आवडणाऱ्या गोष्टी खाव्या वाटत असतील, तरी पोटाला जे योग्य नाही ते खाऊ नको असा संदेशसुद्धा मेंदू देत असतो.जे जीभ म्हणते ते आणि जे पोट म्हणते ते यात बऱ्याचदा गोंधळ उडतो. जीभ आणि पोट हे दोघं मिळून आपल्या शरीराचं पोषण करणार आहेत. म्हणून आइस्क्रीम खावसं वाटतं आहे, पण ते खाल्ल्यानंतर जर सर्दी खोकला होणार असेल आणि त्यातून खूप जास्त साखर पोटात जाणार असेल, म्हणजे ते आपल्यासाठी नक्की वाईट आहे. तर तू कोणाचं ऐकणार? जिभेचं की पोटाचं?
समजा आजची भाजी तुला फारशी आवडत नाही, पण ती शरीरासाठी चांगली आहे, तर तू जिभेचं ऐकणार की पोटाचं?
असे प्रश्न तुझ्यासमोर सारखेच येणार. तुला एक युक्ती सांगू? जास्तीत जास्त वेळा ऐकायचं ते पोटाचं आणि कधीकधीच ऐकायचं ते जीभेचं. दोन्ही अवयव एकाच सांगत असतील तर मग काय? प्रश्नच मिटला!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


