जेवताना मोबाइल बघितलेला चालतो का?

मेंदूची सिक्रेटस
- डाॅ. श्रुती पानसे

Image: freepik

मोबाइल बघताना ज्या भावना आपल्या मनात तयार होतात, ती रसायनं आपल्या खाण्यात मिसळली जातात. ही अत्यंत घातक गोष्ट आहे.
आपण जेवतो तेव्हा शरीरात काय घडतं? तुला हे आठवतंय ना की, प्रत्येक घास तोंडात घालतो, त्यात आपल्या तोंडातली लाळ मिसळली जाते. वेगवेगळ्या टप्प्यावर शरीरातले विविध स्त्राव त्या अन्नामध्ये मिसळले जातात, यालाच पचनक्रिया म्हणतात.

आता समजा आपण जेवतो आहोत, त्या वेळेला एखादी कारस्थानयुक्त मालिका चालू असेल, कोणीतरी कोणाला तरी शिव्या देतो आहे. कोणीतरी रागावतो आहे, मारतो आहे, खूप दुःख झालं आहे म्हणून कोणी रडतो आहे, अशावेळी समोर दिसणाऱ्या पात्राच्या भावनेनुसार आपल्याही भावना मेंदूत आपोआप तयार होतात. कोणी रडत असेल तर आपल्याला वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं, कोणाला तरी पकडून ठेवलं असेल तर आपल्या मनातही तशीच अस्वस्थ करणारी भावना येते.
अशा ज्या काही भावना आहेत त्या भावनांची रसायनं आपल्या मेंदूमध्ये तयार होत असतात. त्या सगळ्या भावना या आपल्या मेंदूमध्ये तयार होतात ती रसायनं आपल्या खाण्यामध्ये मिसळली जातात. आणि तीच रक्ताभिसरणाद्वारे शरीरात सर्वत्र पसरतात. दुःख, चीड, संताप, मत्सर अशा भावना आपल्या शरीरात तयार होतात. ही आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी खूप घातक गोष्ट आहे. म्हणून जेवताना दुसरं काहीही न बघता केवळ आपल्या जेवणाकडे लक्ष केंद्रित करावे. यामुळे आपल्या पचनक्रियेला मदत होत असते. जेवताना मनात चांगल्या भावना असल्या की आपला स्वभाव तसाच घडतो. म्हणून जेवताना मोबाईल बघणं तर नाहीच पण चिडचिड करू नये, कोणाला वाईट बोलू नये असं कायमच म्हटलं जातं.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact