
Image : rspb.org
रोज व्यायाम म्हणून ३ कि.मी चालणं/ पळणं हे शारीरिक आरोग्यासाठी महत्वाचं असतं. लहान आणि मोठ्या माणसांनी हा नियम पाळायला हवा. पण आईनं साधं दुकानात पायी पाठवलं तरी घरी येताना हाशहुश होतं आपल्याला. पण कधी असा प्रश्न पडतो का की छोटे छोटे पक्षी मैलो न मैल अंतर कसे बरं उडत उडत कापत असतील? त्यांनाही आपल्यासारखाच दम लागत असेल का? आपल्यासारखेच हे पक्षीही दमून जात असतील का? काय असतील तर बरं या प्रश्नांची उत्तरं.. हो असेल की नाही? खरंतर या प्रश्नाचं उत्तर एका बातमीत लपलेलं आहे. ही बातमी पक्ष्यांमध्ये असलेल्या ताकदीचा, क्षमतेचा, त्यांच्यात असलेल्या दमसासचा अंदाज येण्यासाठी मदत करणारी अशीच आहे.
ही बातमी आहे एका पक्ष्याने केलेल्या प्रवासाची. आता प्रवास म्हटलं तर कुठे तरी थांबणं, खाणं पिणं , मग पुढे जाणं असंच आपल्या डोक्यात असतं. पण असं काही या पक्ष्याच्या प्रवासाच्या बाबतीत घडत नाही. या पक्ष्याने केलेला प्रवास इतका अजब आहे की त्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड'नेही घेतली आहे.
हेही वाचा!
कोण आहे हा पक्षी?
शेपटीवरचे आडवे पट्टे आणि सुरेखपणे कातरलेल्या कागदासारखी दिसणारी त्याची शेपूट ही ' बार टेल्ड गोडविट' या पक्ष्याची मुख्य ओळख. या पक्ष्यानं अलास्का ते ऑस्ट्रेलियातील टास्मानिया हा ८,४३५ मैलांचा प्रवास न थांबता केला. सलग अकरा दिवस अन्न पाणी, विश्रांती काहीही न घेता बार टेल्ड गोडविटने हा प्रवास केला. हा पक्षी स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखला जातो. हवामानात विशिष्ट बदल झाले, त्या बदलामुळे अन्न मिळणं अवघड होतं, तेव्हा हे प्रक्षी जगण्यासाठी, प्रजननासाठी त्यांन अनुकुल अशा ठिकाणी स्थलांतर करतात. बार टेल्ड गोडविट हे पक्षी मुळातच एका वेळी दीर्घ प्रवास करणारे स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखले जातात.
या पक्ष्यांच्या स्थलांतरणाचा प्रवास कसा असतो? ते उडतना कोणता मार्ग निवडतात, त्यांच्या मार्गात किती आणि कोणते अडथळे येतात, त्यावर हे पक्षी कसे मात करतात याचा अभ्यास करण्यासाठी सॅटेलाइट टॅगद्वारे त्यांच्यावर अभ्यासकांनी नजर ठेवली. बार टेल्ड गोडविट या पक्ष्याला शास्त्रीय भाषेत 'लिमोसा लॅपोनिका' असं म्हटलं जातं. सॅटेलाइटद्वारे या पक्ष्याचं निरिक्षण करण्यासाठी या पक्ष्याला २३४६८४ नंबर असलेली चिप त्याच्या पाठीवर खालच्या बाजूने लावलेली होती.

Image: earthdate
हे निरीक्षण सांगतं की, या पक्ष्यानं अलास्का ते ऑस्ट्रेलियातील टास्मानिया पर्यंत न थांबता १३,५६० कि.मी. अंतर प्रवास केला. बार टेल्ड गोडविटनेने कापलेलं हे अंतर लंडन ते न्यूयाॅर्क दरम्यान अडीच खेपा घालण्याइतकं किंवा आपल्या पृथ्वीच्या परीघाच्या एक तृतियांश इतकं मानलं जातं. या पक्ष्याने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी अलास्काहून प्रवास सुरु केला आणि ११ दिवस एक तासानं हा पक्षी ऑस्ट्रेलियातील टास्मानियायेथील खाडीवर पोहोचला.

Image: theaustralian
अभ्यासक काय म्हणतात?
एरिक वोहलर ऑफ बर्डलाइफ टास्मानिया यांनी या पक्ष्याच्या प्रवासाची सविस्तर माहिती गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकार्डला दिली. या प्रवासात या पक्ष्यानं अजिबात ब्रेक घेतला नाही. दिवस रात्र असा अकरा दिवस अखंड प्रवास केल्याने या पक्ष्याच्या शरीराचं वजन निम्म्यापेक्षा अधिक कमी झालं.
छोट्या शेपटीचे किनाऱ्यावरचे पक्षी जे शाॅर्टटेल्ड शिअरवाॅटर बर्ड म्हणून ओळखले जातात. तेही समुद्रावरुन दीर्घ प्रवास करतात. पण ते उडताना काही काळ पाण्यावर उतरतात. थोडं खातात आणि मग पुढच्या प्रवासाला लागतात. पण या बार टेल्ड गोल्डविटची गोष्टच अजब. या पक्ष्याच्या पायाला इतर पक्ष्यांसारखी जाळी नसते, त्यामुळे ते पाण्यावर उतरु शकत नाही. आणि जर ते उतरले तर ते पाण्यात बुडतील आणि मरतील. जर हे पक्षी थकून खाली समुद्रात पडले तरी मरण्याची भिती असते. हिवाळ्यात हे पक्षी अन्नासाठी अलास्काकडे आपला मोर्चा वळवतात आणि विशिष्ट कालावधीनंतर ते ऑस्ट्रेलियातील पूर्व टास्मानियाच्या ॲनसन्स बेटावर परततात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact