-डॉ. योगिता आपटे
लहान मुलांना ताण येण्याची बरीच कारणं आपण आत्तापर्यंत बघितली. पण त्याशिवाय इतरही काही कारणं अशी असतात ज्यामुळे मुलांना ताण येतो, पण ती कारणं पटकन लक्षात येत नाहीत. म्हणजे कोणाला सांगितलं, तर तो म्हणेल, “ह्यात टेन्शन येण्यासारखं काय आहे? काहीप्पण!”

म्हणजे बघा हं, तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण जर का असं म्हणाली, की मला माझ्या आवडत्या गोष्टी करायला मिळत नाहीत त्याचं टेन्शन येतं.” किंवा “मला सारखं सारखं कुठल्या ना कुठल्या क्लासला जावं लागतं आणि त्याचं मला टेन्शन येतं.” तर? यात स्ट्रेस घेण्यासारखं काय आहे हेच बहुतेक कोणाच्या लक्षात येणार नाही. पण काही मुलांना मात्र त्याचा खरोखर ताण येतो. विशेषतः ज्या मुलांना सतत एका क्लासहून दुसऱ्या क्लासला, एका छंदवर्गातून दुसऱ्या छंदवर्गात असं जायला लागतं, त्या मुलांना मोकळा वेळ नसल्याचा स्ट्रेस येतो. कारण लहान मुलांना दिवसातील निदान थोडा वेळ “काहीच न करता” आपला आपला घालवायला मिळणं फार फार महत्वाचं असतं. आणि त्यांना जर बरेच दिवस तो वेळ मिळाला नाही तर त्याचा ताण येऊ शकतो.
हेही वाचा!
लहान मुलांनाही टेन्शन येतं? इतक्या लहान वयात मुलांना कसला ताण येतो?
मुलांचे स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे कोणाला कशाचा ताण येईल ते सांगता येत नाही. त्यापैकी अनेक गोष्टी अश्या असतात की मोठ्या माणसांना त्या लक्षात येत नाहीत. अशा वेळी आपण आपल्या आईबाबांना ते समजावून सांगायला लागतं. मात्र काही वेळा मुलांना अशा गोष्टीचा स्ट्रेस येतो जे योग्य नाही.
म्हणजे, काही मुलांना ‘त्यांच्या मनासारखं झालं नाही’ याचा स्ट्रेस येतो. पण त्याचा स्ट्रेस घेणं बरोबर नाही. कारण नेहेमी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल हे काही शक्य नसतं. प्रत्येक मुलाला - मुलीला आणि मोठ्या माणसालासुद्धा हे समजून घ्यावं लागतं की प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. त्यामुळे आपल्याला राग येणं, वाईट वाटणं, रडू येणं हे सगळं नैसर्गिक आहे. पण त्या गोष्टींचा आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नसतो. ते मात्र आपल्याला शिकावं लागतं. राग किंवा रडू आलं तरी ते पटकन आवरून पुन्हा आपला मूड पूर्वीसारखा करता आला पाहिजे.
याशिवाय काही मुलं खूप भावनाशील असतात. त्यांना इतर कोणालातरी त्रास झाल्याचाही स्ट्रेस येतो. म्हणजे, इतर कोणाच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम झाला तरी त्यांना वाईट वाटतं. शाळेत दुसऱ्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला सगळ्यांनी मिळून एकटं पडलं तरी या भावनाप्रधान मुलांना त्याचा ताण येतो.

घरात भावंडांमध्ये होणारी भांडणं खरं तर अगदी नॉर्मल समजली जातात. पण आपल्या भावंडांशी आपली सतत भांडणं होतात याचा काही मुलांना ताण येतो. काही मुलांचे आईवडील किंवा घरातली इतर माणसं सतत त्यांच्यावर टीका करतात. म्हणजे कसं? तर समजावून सांगण्याच्या ऐवजी “एवढं साधं समजत नाही का?” किंवा “तुझ्याच्याने कधीच काही धड होणार नाही” असं म्हणतात. आपल्या आईबाबांनी किंवा आजीआजोबांनी असं बोलण्याचा मुलांना फार फार त्रास येतो आणि ताणसुद्धा येतो.
पण आपल्याला किंवा आपल्या मित्रमैत्रिणीला ताण आलाय हे कसं ओळखायचं आणि त्यावर इलाज काय? हे उद्या समजून घेऊया.
yogeeta.apte@gmail.com
लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


