-डॉ. योगिता आपटे
आपल्याला नेहेमीच असं वाटत असतं की आपण तर फार कमी वेळ गेम खेळतो किंवा सोशल मीडियावर वेळ घालवतो. पण प्रत्यक्षात तसं असतं का? किती वेळ म्हणजे थोडा वेळ असं काही गणित असतं का? तर असतं. आज भारतात माणसं रोज सरासरी पावणेपाच ते पाच तास स्मार्टफोन वापरतात. हा वेळ फार जास्त आहे. शिवाय आपण टीव्ही आणि कॉम्प्युटर वापरतो ते वेगळंच.

जास्तीत जास्त किती वेळ स्क्रीन वापरला तर चालतो?
०-२ वर्षे - अजिबात स्क्रीन नको
२-५ वर्षे - ४५ मिनिटे
५-१२ वर्षे - १.१५ तास
१२-१७ वर्षे - १.३० तास
१७-२५ वर्षे - २ तास
त्याहून मोठी माणसं - २.५ तास (दिवसाचा १० टक्के वेळ)
हेही वाचा!
खरं तर याहून जास्त वेळ स्क्रीन वापरू नये. पण काही वेळा कामासाठी / अभ्यासासाठी तो वापरावा लागतो. आणि मग त्यातून आपल्याला त्याचं व्यसन कधी लागलं ते समजत नाही. आपण नुसतेच फार वेळ मोबाईल वापरतो का आपल्याला चक्क व्यसन लागतंय हे कसं ओळखायचं? तर त्याच्या काही सोप्या ट्रिक्स आहेत. आपण असे वागत असू तर आपण काळजी वाटण्याच्या अवस्थेला आहोत हे समजून चालायचं.
आपण खालीलपैकी काय करतो?
१. आपण जो स्क्रीन वापरत असू तो सतत वापरत रहावासा वाटणं. म्हणजे फोन वापरणं / व्हिडीओज, रील्स, मीम्स बघणं, गेम खेळणं इ.
२. सतत फोनवर जे बघितलेलं / केलेलं असतं त्याबद्दलच बोलत राहावंसं वाटणं
३ .फोन वापरत नसतांना अस्वस्थ वाटणं
४. चिडचिडेपणा वाढणं
५. एकाग्रता कमी होणं
६. फोन सोडून इतर काहीही करावं लागलं तर लगेच बोअर होणं
७. इतर कुठलंही काम करण्याची टाळाटाळ करणं
८. इतर रोजची कामं, म्हणजे अगदी जेवण, आंघोळ, अभ्यास हे सुद्धा घाईघाईने संपवणं जेणेकरून परत फोन घेऊन बसता येईल.
९. तुमचा एकूण सगळा दिवसच फोन आणि स्क्रीनभोवती प्लॅन करणं
१०. झोप न लागणं
११. सतत फोनला हात लावणं आणि काही नोटिफिकेशन्स आली आहेत का ते बघणं. इतकं, की ते न बघणं शक्यच होत नाही.
१२.आपल्या फोनला इतर कोणाला हातसुद्धा लावू न देणं.
१३. फोन बघण्यातून जो आनंद मिळतो त्यासाठी आधीपेक्षा जास्त जास्त वेळ स्क्रीन वापरावा लागणं.
स्क्रीनच्या व्यसनातून बाहेर कसं पडायचं?
१.सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यात शारीरिक हालचाल होईल अश्या ऍक्टिव्हिटीज शोधा आणि त्या करा. मग ते फिरायला जाणं असेल किंवा एखादं काम करणं असेल.
२.कुठलाही प्रश्न पडला तर तो सोडवण्यासाठी सगळ्यात आधी स्वतः विचार करा, प्रयत्न करा. त्यातून तो सुटला नाही तर पुस्तकात उत्तर शोधा. मग वाचनालयात जा. शिक्षक, पालक, मित्रमैत्रिणींशी बोला. आणि तरीही प्रश्न सुटला नाही तरच गूगल करा.
३. प्रत्येक वेळी फोन वापरण्याच्या ‘आधी’ त्यासाठी टायमर लावा. स्क्रीनटाईम वर लक्ष ठेवणारी अनेक ऍप्स असतात. ती वापरा.
४. तुम्हाला मोबाइलवरचे गेम्स आणि सोशल मीडिया सोडून काय करायला आवडतं ते शोधा. पुस्तक वाचणं, फिरायला जाणं, बागेत / शेतात काम करणं, कुठलातरी खेळ खेळणं, कलाकृती बनवणं हे करून बघा.
५. मित्रमैत्रिणींशी / भावंडांशी / नातेवाईकांशी प्रत्यक्ष गप्पा मारा. खरं तर चॅटिंग करण्यापेक्षा कट्ट्यावर भेटा!
yogeeta.apte@gmail.com
(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत.)
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact