देशावर बॉम्ब हल्ले होताना आनंदाने खेळणाऱ्या मुलांची गोष्ट

- माधुरी पेठकर

Image:globaltimes

घरात, सोसायटीच्या आवारात, बागेत किंवा मोकळ्या मैदानात आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर खेळताना किती मजा येते ना? तासनतास फक्त खेळत राहावं असं वाटतं… आपला खेळ संपूच नये, आपल्याला आईबाबांनी किंवा आजीआजोबांनी घरी बोलवूच नये… तुम्हालाही असंच वाटतं ना? खेळायला मिळावं, खूप खूप खेळावं, खेळतच राहावं असं जगातल्या सगळ्या मुलांना वाटतं. पण सगळ्यांनाच मुक्तपणे, स्वच्छंदी मनाने आनंदाने खेळता येतं का?
आज जगातल्या काही देशांमध्ये युध्द सुरु आहे. जिथे माणसं राहतात त्या वस्त्यांवर, शाळा, काॅलेज, दवाखाने अशा अनेक ठिकाणांवर बाॅम्बहल्ले, क्षेपणास्त्रे हल्ले होतात. माणसं सुरक्षित राहाण्यासाठी आपली घरं सोडून निर्वासित छावण्यांमध्ये जात आहेत, बंकरमध्ये लपून बसली आहेत. मोठी माणसं युध्द संपून पुन्हा आपआपल्या घरात सुरक्षित जगण्याची वाट पाहात आहेत. लहान मुलं अशाही परिस्थितीत संधी मिळेल तशी एकमेकांशी खेळत आहेत. जी मुलं आईबाबांबरोबर आपआपल्या घरात राहातात ती बाहेर थोडी शांतता दिसली की खेळायला जातात. पण त्यांचे आईबाबा त्यांना घराच्या जवळच खेळण्याच्या अटीवर खेळायला पाठवतात. सायरनसारखा कुठला आवाज आला की ती सावध होतात आणि खेळ अर्धवट सोडून घरी पळतात.

हेही वाचा!

इस्त्राएल-अमेरिका आणि इराण युध्दात होर्मुझची एवढी चर्चा का होतेय?

इस्त्रायल, इराण, युक्रेन, गाझा या सर्व युध्दग्रस्त भागातली मुलं सध्या आपआपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळण्यासाठी आसूसलेली आहेत.
युद्धामुळे भयभीत होवून मोठी माणसं बंकरमध्ये, घरांमध्ये लपून बसलेली असताना मुलांची हिंंमत कायम राहावी यासाठी खेळ महत्त्वाचा आहे हे ओळखून युनिसेफ सारख्या जागतिक संघटना मुलांना खेळतं करण्यासाठी पुढाकार घेतात. युध्दग्रस्त भागातील मुलांसाठी खेळण्याच्या जागा तयार करतात. मुलांसोबत त्यांना आनंद देणारे, त्यांना कृती करण्यास प्रेरणा देणारे खेळ घेतात.
निर्वासित छावण्यांमध्ये एक साधी सतरंजी अंथरली जाते. मुलं एकत्रितरित्या बसतात आणि त्यांच्यासोबत अनेक बैठे खेळ घेतले जातात. या खेळातून त्यांचं मनोरंजन होतं. त्यांच्या मनावरचा युध्दाचा ताण गळून पडतो.

Image:globaltimes

 

मुलांना खेळायला मिळायलाच हवं, कारण…
१. खेळण्यामुळे मुलांचा मूड छान होतो.
२. मनावर आलेला ताण कमी होतो.
३. पुढे सगळं छान होईल ही आशा खेळामुळे मुलांमध्ये निर्माण होते.
४. युध्दाच्या भीतीमधून बाहेर पडण्यासाठी मुलांना खेळांची मदत होते.
५. युध्दामुळे शाळा बंद पडतात. अशावेळी मुलांना घराबाहेर पडण्याची संधी हवी असते.

 

युध्दग्रस्त भागात मुलांसाठी खेळ घेण्याची सुरुवात युनिसेफने १९९९ मध्ये कोसोवो युध्दात केली होती. नंतर जिथे जिथे युध्दग्रस्त भाग आहे किंवा भूकंप, वादळं यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तेथील माणसं बेघर झालीत, निर्वासित म्हणून राहू लागली, त्या निर्वासित मुलांसाठी युनिसेफने खेळ घ्यायला सुरुवात केली. युद्ध आणि आपत्तीग्रस्त भागात मुलांसाठी खेळायला जागा तयार करणे हा युनिसेफच्या कामाचा महत्वाचा भाग झाला.
सीरियाच्या लटाकिया या ग्रामीण भागातील ११ वर्षांची जाना आणि तिच्यासारख्या अनेक मुलांना या खेळांमधून स्वत:चा आनंद सापडू शकला.सुदानमधील कसाला राज्यातील शागार्ब छावणीत राहणारी १२ वर्षांची सबरिन युनिसेफने आयोजित केलेल्या खेळण्याच्या कॅम्पमध्ये गेली. तेव्हा तिला तिच्यातली क्रिएटिव्हिटी वापरुन चित्र काढण्याची, ते रंगवण्याची संधी मिळाली. या गोष्टीमुळे सबरिन आणि तिच्यासारख्या तेथील अनेक मुलांच्या मनातली निराशा दूर झाली.
डॅरिला ही १२ वर्षांची युक्रेनमधली मुलगी. तिची आई आर्यना मुलांसाठी नृत्याचे वर्ग घेते. स्वत: डॅरिलाही तिथे नृत्य शिकते. नृत्य करते. यामुळे डॅरिलाचा मूड सुधारला. स्मरणशक्ती चांगली झाली. ती स्वत: चित्रं काढू लागली, कागदांच्या वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू तयार करु लागली.

Image: globaltimes

गाझामध्ये जिथे बाॅम्ब हल्ल्यांनी सर्व परिसर बेचिराख झाला आहे तिथेही मुलं विरंगुळ्यासाठी खेळतात. त्यांच्याकडे खेळण्याही नसतात. पण जे सापडेल त्या वस्तूंद्वारे ते खेळणी तयार करतात.
ज्या ज्या देशांमध्ये युद्ध सुरु आहे तिथली मुलं या अवघड परिस्थितीतही खेळतात. खेळण्यातून आपला आनंद शोधतात. युद्धाच्या अवघड काळात आपलं जगणं आनंदी करतात.
खेळणं हा टाइमपास नाही. मुलांच्या आनंदासाठी, विकासासाठी खेळणं खूप महत्त्वाचं असतं. खेळण्यातून ताण , वेदना, दु:ख विसरले जातात. 'मुलांनो खेळा, खूप खेळा. तुमचा हक्क आहे खेळण्याचा. खेळत राहा' हेच या युध्दग्रस्त भागात खेळण्यात रमलेली मुलं, मुलांना खेळता यावं यासाठी प्रयत्न करणारी युनिसेफ सतत सांगते आहे. खेळण्यासाठीच्या त्यांच्या हाका तुमच्यापर्यंतही पोचतायत ना?

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact