मित्र मैत्रिणींना पेन-पट्टी-खोडरबरची मदत लागली तर तुम्ही करता की त्यांची गंमत बघता?

गोष्ट इमोशन्सची

- डाॅ. श्रुती पानसे
मेंदू आणि शिक्षण अभ्यासक

Image: freepik

'हे बघ तू शाळेत जातो आहेस . पण तुझी पट्टी जपून वापर आणि ती कुणालाही देऊ नकोस. तुझ्याकडे नीट ठेव. तुझी पट्टी ,पेन्सिल कोणालाही लागलं तरी सुद्धा त्यांना देऊ नकोस.'- असं एक आईबाबा आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना सांगताना मी अइकलं होतं. असं कधीकधी तुमचे आई बाबाही तुम्हाला सांगत असतील ना!
खरं तर दुसऱ्याकडे एखादी वस्तू नसेल आणि आपल्याकडे असेल तर आपण ती द्यावी. पण परत मागूनही घ्यावी आणि आपल्याकडे ती असू द्यावी. ही गोष्ट पट्टी, पेन्सिल, खोडरबर ,खेळणं ,आपला स्वतःचा डबा या संदर्भात पण असतेच. आपण शाळेमध्ये एकत्र डबा खातो तेव्हा सहाजिकच 'थोडं तुझं थोडं माझं' असं करत खातो. आपला डबा आपणच खायचा, तो दुसऱ्याला द्यायचा नाही असं कधीच करू नये; कारण एकत्र डबा खाणं ही गोष्ट आपल्यातलं प्रेम वाढवणारी असते.

हेही वाचा!

मित्रांना शाबासकी आपला मात्र जळफळाट. कोणाच्या कौतुकानं त्रास का होतो?

आपल्या वस्तू जपणं ही गोष्ट योग्यच आहे. कारण शेवटी त्या वस्तूंसाठी आपल्या आई-बाबांनी पैसे खर्च केलेले असतात. आपल्याला वस्तू हरवण्याची सवय लागू नये म्हणूनही ते तसं म्हणत असतात. पण कधीतरी आपल्यालाही एखाद्या वस्तूची गरज लागू शकते . आपल्याकडे वस्तू आहे पण आपण ती शाळेत न्यायला विसरलो असंही होऊ शकतं. अशावेळी जर कोणी आपल्याला मदत केली तर आपल्याला किती छान वाटतं! अशाच पद्धतीनं दुसऱ्यांनासुद्धा जर आपण मदत केली तर त्यांनाही छान वाटणार असतं .

आपला समाजसुद्धा अशाच पद्धतीनं चालतो आणि चालायला हवा. जी गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला ती वस्तू दुसऱ्यानं देणं आणि दुसऱ्यांनी ती वेळेवर परत करणं आणि अशाच कुठल्यातरी तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या माणसाला मदत करणं यामुळेच तर समाजातील एकोपा टिकून राहायला मदत होते. 'सर्वकाही माझंच' अशी वृत्ती यामुळे निर्माण होत नाही.

शब्द महत्त्वाचे!
१.. काहीजणांनी मिळून एखाद्या गोष्टीचा वापर केला तर ती प्रकृती.
२. आपल्याला कमी पडत असतानाही आपल्यातलं काढून दुसऱ्याला देणं ही संस्कृती.
३. माझं आहे, तर ते मीच वापरणार, कोणालाही देणार नाही ही विकृती.
- आपल्यात यातल्या कोणत्या भावना आहेत आणि कोणत्या जोपासायला हव्यात ते आपणच ठरवायला हवं!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact