गोष्ट इमोशन्सची
- डॉ. श्रुती पानसे
मेंदू आणि शिक्षण अभ्यासक

आपल्यापेक्षा मित्र मैत्रिणींना चांगले मार्क्स मिळाले, त्यांचं कोणी कौतुक केलं की आपल्याला छान का नाही वाटत?
' मी सहामाही परीक्षेत नापास झाले आहे. आता वार्षिक परीक्षेत मी इतका अभ्यास करीन की वर्गात पहिला नंबर मिळवून दाखवीन .'
' वर्गात टीचर नेहमीच अर्णवने काढलेल्या चित्राचं कौतुक करतात. आता मी इतकं चांगलं चित्र काढून दाखवीन की माझं पण वर्गात कौतुक झालं पाहिजे.'
' घरात नेहमी माझं चुकत असतं आणि त्या येड्या धाकट्याचं मात्र बरोबर असतं, असं आई-बाबांना नेहमी वाटतं. एवढेच काय आजी आजोबांना पण तसंच वाटतं. आता मी त्याच्यापेक्षा जास्त चांगलं वागून दाखवीन.'
आहेत ना ही सगळी ओळखीची वाक्यं?
कधीतरी आपण पण मनात म्हटलेली असतील.
या वाक्यामध्ये ' मी ' कुठेतरी कमी आहे आणि ' त्याच्या' पेक्षा चांगलं करून दाखवीन असा भाव आपल्याला दिसतोच आहे. पण तेवढाच भाव आहे का? की त्याच्यापेक्षा अजून वेगळी काही भावनांची छटा दिसते आहे? कोणापेक्षा तरी वरचढ असण्यातून असूया नावाची एक भावना डोकावते का तुमच्यात, बघा बरं!
हेही वाचा!
आदल्या दिवशी खूप राग आणि दुसऱ्या दिवशी राग गायब.. हे तुमच्याबाबतीतही होतं का?
प्रयत्न की स्पर्धा?
१) मला आधीपेक्षा चांगलं करून दाखवायचं आहे,
२) मी त्यासाठी प्रयत्न करेन इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत बरोबर आहे .
३) मला अमुकपेक्षा जास्त चांगलं करून दाखवायचं आहे.
ही तिसरी भावनेची छटा शक्यतो आपल्या मनात यायला नको. पण ती येतेच. ती आपोआपच येते. कोणापेक्षा तरी मला चांगलं काहीतरी मिळवायचं आहे, ही भावना मनात येतेच.
कोणापेक्षा तरी चांगलं.. असं वाटलं तर..
अशी भावना मनात आली तर त्याकडे लक्ष न देता मला आधीपेक्षा चांगलं करायचं आहे, मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे या दोन गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित करावं.
त्यातली दुसरी गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे. ती म्हणजे प्रयत्न! अनेकदा प्रयत्न करायला आपण कमी पडतो. सुरुवातीला दुसऱ्यापेक्षा वरचढ व्हायची भावना असताना केलेले संकल्प नंतर तितके प्रभावी राहात नाहीत. हळूहळू आपण काय ठरवलेलं आहे, आपल्याला कुठे पोहोचायचं आहे याचाच विसर पडतो. आणि परत पहिले पाढे पंचावन्न होतात.
तसं होऊ द्यायचं नाही. म्हणजेच काय तर आपली स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नाही, तर आपली स्पर्धा स्वतःशीच करायची आहे.
मला आधीच्या परीक्षेत जर तिसापैकी पंधरा असतील तर मला मार्क माझ्यासाठी वाढवायचे आहेत. एवढंच पुरेसं असतं. कोणापेक्षा वरचढ होण्यापेक्षा, माझ्या आधीच्या कामगिरीवर खुश न राहता, मला पुढची कामगिरी जास्त चांगली करायची आहे हे मनात असणं महत्त्वाचं!
ishruti2@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


