
इसापच्या गोष्टीत कोल्हा हसून म्हणाला किंवा माकडाने हसत हसत विचारले असे उल्लेख येत असले तरी हे प्राणी काही माणसांसारखे हसत नाहीत. पण जंगलातील एका प्राण्याला मात्र 'लाफिंग ॲनिमल' म्हणजे हसणारा प्राणी म्हणूनच ओळखतात. हा प्राणी म्हणजे तरस. बेढब शरीराचा आणि मेलेली जनावरं फाडणारा म्हणून त्याच्याबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावनाच असते. तरसाला इंग्रजीत 'हायना' तर हिंदीत 'लकडबग्गा' म्हणतात. तरसाच्या शरीराची ठेवण आणि त्याचे वर्तन कुत्र्यापेक्षा अगदी भिन्न असल्याने त्यांचे 'हायनिडी' हे स्वतंत्र कूळ मानलं जातं. पट्टेवाल्या तरसाचा चेहरा काळ्या केसांनी झाकलेला असतो. तरसांच्या विविध जाती जगभरात आफ्रिका, मध्य आशिया, मध्य पूर्व आणि भारतीय उपखंडात आढळतात. मात्र भारतात पट्टेवाले तरस ही एकच जात आढळते. आफ्रिकेतील ठिपकेवाले तरस कळपाने राहातात आणि प्रसंगी शिकारही करतात. भारतातील पट्टेवाले तरस मात्र स्वभावाने शांत असतात. त्यांना एकांत आवडतो. फारतर ते जोडीने राहतात. जंगली प्राण्यांपासून ते जरा अंतर राखूनच राहातात. पट्टेवाले तरस जेव्हा एकटेच असतात, तेव्हाच शिकार करतात. प्रामुख्याने इतर प्राण्यांनी मारलेल्या, खाऊन उरलेल्या प्राण्यांवरच त्यांची गुजराण होते. गिधाडे, कोल्हे यांनी खाल्ल्यानंतर उरलेली हाडे फोडून खाण्याचे काम तरस करतो. निसर्गातील प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावून स्वच्छता राखण्याचे काम तरसाकडून होते. त्यांना निसर्गातले सफाई कामगार असेही म्हणतात.
हेही वाचा!
फळं खाऊन बिया थुंकणारा धनेश

तरस हे निशाचर असल्यामुळे दिवसाढवळ्या त्याचे दर्शन क्वचित होते. तरस हे पाण्याच्या आसपासच राहातात. तरसाच्या शरीरावरचे पट्टे उन्हाळ्यात जास्त ठळक दिसतात. तरसाचे मागचे पाय पुढच्या पायांच्या तुलनेने आखूड असतात. त्यामुळे ते खुरडत / लंगडत चालते. त्याच्या शेपटीखालच्या गंध ग्रंथीमुळे त्याच्या शरीराचा उग्र वास दूरपर्यंत येतो. डोंगर कपारीत किंवा बिळे खोदून तरस राहतात. याच बिळात मादी पिलांना वाढवते. पिल्लांना जन्म देण्याचा तरसांचा विशिष्ट कालावधी नसतो. मादी तरसाच्या गर्भधारणेचा कालावधी ९० ते ९२ दिवसांचा असतो. तरसाच्या पिल्लाला छावा म्हणतात. छावा जन्माला येतो तेव्हा तो आंधळा असतो. जन्मल्यानंतर ७ ते ८ दिवसांनी त्याला दिसायला लागतं. तसेच दात येण्यास तीन आठवडे लागतात. इतर शिकारी प्राण्यांबरोबर तरस अंतर राखून राहते. क्वचित शिकारी प्राण्यांकडून घेरले गेल्यास तरस जमिनीवर निपचीत पडून मेल्याचे नाटक करते. ताडोबा, रणथंबोर, झालाना या जंगलांमध्ये पट्टेदार तरस पाहायला मिळते.
पट्टेवाले तरस ठिपक्यांच्या तरसांच्या तुलनेत कमी बोलतात. हे तरस तोंडातून जे स्वर काढतात त्यातून माणसं हसण्याचा, माणसांच्या कुजबुजीचा भास होतो. म्हणून तरस हसतात असं म्हटलं जातं. तरसांचं हे हसणं, म्हणजेच ते तोंडातून काढत असलेले स्वर हे एकाच प्रकारचे नसतात. भीतीचा, धोक्याचा संदेश पोहोचवण्यासाठी ते वेगवेगळे स्वर काढतात.

सिंह तरसांची शिकार करत असले तरी सिंहापेक्षा तरसांना मानवापासून खरा धोका आहे. कारण माणसाकडून त्यांची शिकार तर होतेच शिवाय आद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे तरसांचा अधिवास क्षेत्र (राहाण्याची जागा) कमी कमी होतं आहे. संपूर्ण जगभरात पट्टेवाल्या तरसांची संख्या केवळ ५००० ते १४००० एवढीच आहे. तरसांबद्दल घृणा बाळगण्यापेक्षा, त्यांचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल कुतुहल जागे करुन जास्तीत जास्त माहीती करुन घेणे जास्त गरजेचे आहे.
- मकरंद जोशी
( लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत.)
makarandvj@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


