डेन्मार्क आहे जगातला सर्वात स्वच्छ देश. येथील हवा देखील सर्वात शुध्द!

Image: nomadcapitalist

सार्वजनिक ठिकाणी कचर करु नये, एवढंही समजत नाही का लोकांना असं आपण नेहमी म्हणत असतो. . पण नुसतं म्हणून काय उपयोग? आपण राहातो ती जागा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी आपण काय करतो? हे महत्त्वाचं. खरंतर आपण म्हणजे देशातल्या प्रत्येकाने स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले तरच आपला परिसर स्वच्छ होणार असतो. जगात डेन्मार्क हा असा देश आहे जिथला प्रत्येक नागरिक आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी धडपड करतो. आणि म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून डेन्मार्क देश स्वच्छतेच्या बाबतीत जगात अव्वल क्रमांकावर आहे.  

हेही वाचा!

डेन्मार्क देश स्वच्छतेसाठी काय करतो?

डेन्मार्कमधील नागरिकांची 'अतिशय नम्र माणसं' अशी ओळख आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची ते आवर्जून काळजी घेतात. मग ती व्यक्ती असो की जागा. 'कचरा करु नये' ही शिकवण लहानपणापासून डेन्मार्कमधील आई-बाबा आपल्या मुलांना देतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना कुठेच कचरा करायचा नाही ही गोष्ट डेन्मार्कमधील प्रत्येकाच्या मनावर लहानपणीच कोरली जाते. कोणी बाहेरच्या देशातील माणसं डेन्मार्कमध्ये फिरत असताना त्यांनी जर रस्त्यावर कचरा टाकला तर डेन्मार्क देशाचे नागरिक ज्याला दिसेल त्याने उचलावा या नियमाप्रमाणे स्वत: तो कचरा उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकतात.

डेन्मार्कच्या संस्कृतीतील एक महत्त्वाचं मूल्य आहे, जे शिकवण म्हणून लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं जातं. ते म्हणजे आपलं काम झाल्यावर त्या जागेवर कोणताही कचरा राहात कामा नये. आपण सार्वजनिक ठिकाणी जिथे आहोत तिथला भाग स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी. ही शिकवण डेन्मार्कमधील लहान मुलंही पाळतात. केवळ लहान मुलंच नाही तर मोठी होवून जबाबदार नागरिक बनतात तेव्हा देखील हे मृल्य ते कायमस्वरुपी पाळतात.

कोणीतरी विशिष्ट माणसं किंवा संस्था स्वच्छतेची कामं करतात असं नाही. तर डेन्मार्क देशाचा प्रत्येक नागरिक स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी उचलतो. आपला देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काहीही करायला तयार आहे असा डेन्मार्कमधील प्रत्येक नागरिकाचा दृढ निश्चय आहे.

डेन्मार्क देशाचे नागरिक निसर्गाचा आदर करतात. निसर्गाला जपतात. निसर्गाचा विचार करुनच आपल्याला जितकं लागतं तितकंच आपण घ्यावं, वापरावं. या सवयीमुळे कमीत कमी कचरा निर्माण होतो. आपल्याला पटली नाही, आवडली नाही म्हणून टाकून दिली वस्तू कचऱ्यात असं इथली माणसं वागत नाहीत. आपल्या देशाची जगातला सर्वात स्वच्छ देश ही ओळख कायम राहावी असं येथील लोकांना मनापासून वाटत असल्याने ती सतत प्रयत्न करत असतात.

डेन्मार्कमध्ये वायू प्रदूषण नाही. वायू प्रदूषणाचं मुख्य कारण असलेल्या चारचाकी गाड्या डेन्मार्कमध्ये फार कमी आहेत. फार कमी लोकांकडेच चारचाकी गाड्या आहेत. येथे चारचाकी गाड्या फार महाग आहेत. लोकं स्वत:ची कार घेण्यापेक्षा पायी चालणे, सायकल वापरणे किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे असे पर्याय वापरतात. त्यामुळे रस्त्यांवर गाड्यांची गर्दी कमी असते.

Image: nomadcapitalist

हेही वाचा!

पर्यावरणास हानी पोहोचेल अशी कोणतीही गोष्ट या देशातले नागरिक वापरत नाही. आपल्या देशात जे काही असेल ते पर्यावरण पूरक असेल याची काळजी डेन्मार्कमधला प्रत्येक व्यक्ती घेते.

सर्व युरोपिय देशांमध्ये डेन्मार्क देशाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. लोकसंख्या मर्यादित असल्याने आणि येथील प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेसाठी कटिबध्द असल्यामुळे डेन्मार्क जगात सर्वात स्वच्छ देश आहे.

मोठ्या स्वरुपातील सार्वजनिक कार्यक्रम, सणसमारंभ, उत्सव या काळात लोकं स्वच्छता ठेवण्यासाठी स्वत:हून स्वयंसेवक म्हणून पुढे येतात. सार्वजनिक ठिकाणी वावरताना, सार्वजनिक मालकीच्या वस्तू आणि सेवा वापरताना आपल्या नंतर इतरही ते वापरणार आहे याचा विचार करुन ती नीट वापरणे, आपल्या पुढच्या पिढीलाही स्वच्छ वातावरण मिळण्याचा हक्क आहे याची जाणीव ठेवून लोकं वागतात.

Image: nomadcapitalist

 निसर्ग आणि लोकांचं आरोग्य सुरक्षित ठेवणं हे या देशाचं मुख्य ध्येय आहे. या ध्येयासाठी इथला प्रत्येकजण काम करतो म्हणूनच २०२२ मध्ये डेन्मार्कला 'एन्व्हाॅर्यमेण्टल परफाॅर्मन्स इंडेक्स'मध्ये पहिला क्रमांक मिळाला.

डेन्मार्क देशाने अक्षय ऊर्जानिर्मितीचं ध्येय ठेवलं आहे. हवा, सूर्यप्रकाश, भूऔष्णिक वीजनिर्मिती होते. हवामान बदलास कारणीभूत असलेलं कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न येथे सातत्याने होतो. तसेच कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याची विशिष्ट व्यवस्था असल्याने त्याचा परिणाम म्हणून डेन्मार्क देशातील हवा देखील सर्वात शुध्द आहे.

एक अख्खा देश स्वच्छ झाला कारण प्रत्येकाने घरात, घराच्या बाहेर स्वच्छता ठेवण्याची आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. आपला देशही डेन्मार्कसारखा स्वच्छ करायचा असेल तर आपणही आपली जबाबदारी उचलायला हवी. तुम्ही आपला देश स्वच्छ राखण्यासाठी काय जबाबदारी घेणार आहे, हे मलाही नक्की सांगा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact