- विनय र.र.
( मराठी विज्ञान प्रसारक)
vinay.ramaraghunath@yahoo.com

आपण शाळेत शिकतो की कोळसा हा ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. विजेच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कोळसा वापरला जातो. कारखान्यांसाठी आणि रेल्वेसाठीसुद्धा कोळसा वापरला जातो. एवढ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या कोळश्यामध्ये पर्यावरणाचा शत्रू दडलेला आहे. कोळशाच्या खाणीतून तो बाहेर पडत असतो. मिथेन गॅस हे त्याचं नाव. मिथेन हा वायू पर्यावरणाला मोठा धोका निर्माण करतो.
घातक असूनही वापर सुरुच!
- मिथेन (CH₄) हा रंग नसलेला, वास नसलेला वायू आहे. त्याला ‘मार्श गॅस’ म्हणूनही ओळखले जाते. मार्श म्हणजे दलदल. जंगलात दलदलीच्या सैलसर चिखलात सेंद्रिय पदार्थ म्हणजे सजीवांचेअवशेष कुजताना मिथेन हा वायू तयार होत असतो. तो पेट घेऊ शकतो. दलदलीच्या जवळ जंगलात अशा अचानक ज्वाळा दिसतात. मग लोक म्हणतात, 'तिथे आग्या वेताळ आहे!'
- कोळसा खाणीतून निघणाऱ्या नैसर्गिक वायूमध्ये ८७ टक्के मिथेन असतो. कोळशाच्या खाणींमध्ये हा वायू कोळशाच्या थरात अडकलेला असतो. जेव्हा खाणकाम सुरू करतात तेव्हा तसेच खोदकाम करतात तेव्हा, खाणीत हवा खेळवतात तेव्हा किंवा स्फोट घडवतात तेव्हा मिथेन वायू वातावरणात सोडला जातो. कोळशाच्या खाणी खोल खोल होत चालल्याने हा वायू आणखी जास्त प्रमाणात बाहेर पडत आहे.
हेही वाचा!
कचऱ्याचा ढीग म्हणजे पर्यावरणाच्या डोक्याला ताप.. तो कसा?
- २०२५ मध्ये जगात ९११ कोटी टन कोळसा उत्पादन झाला. यातून सुमारे ४ कोटी टन मिथेन बाहेर पडला. २०२५ मध्ये चीन या देशाने जगात सर्वात जास्त म्हणजे ४.८३ अब्ज टन कोळसा उत्पादन केला. यातून सुमारे २.२ कोटी टन मिथेन त्यातून बाहेर पडला. याच काळात भारताने १.०४ अब्ज टन कोळसा उत्पादन केला. यातून सुमारे ०.१४ कोटी टन मिथेन त्यातून बाहेर पडला.
जगभरात कोळसा खाणीतून दरवर्षी सुमारे ४ कोटी टन मिथेन वायू बाहेर पडतो. चीनमध्ये सर्वात जास्त कोळसा खाणीतून काढला जातो. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश आहे. चीनमध्ये २०२५ मध्ये कोळसा उत्पादन ४.८३ अब्ज टन झाले. खाणी खोल असल्याने मिथेन जास्त बाहेर पडतो.
भारत: दुसरा क्रमांक. उत्पादन वाढत आहे, पण मिथेन उत्सर्जनही वाढते आहे. २०१९ मध्ये ८.१ लक्ष टन होते, ते आता १३-१५ लक्ष टनापर्यंत गेले आहे. मिथेन वायू वापरात आणण्याचे प्रमाण अजून खूप कमी आहे. एम्बर अभ्यासानुसार २०२९ पर्यंत १६ लक्ष टनपर्यंत जाऊ शकते. - २०१९ मध्ये भारतातील कोळसा खाणीतून सुमारे ८ लाख टन मिथेन उत्सर्जित झाला. कोळसा उत्पादन वाढवण्याच्या योजनांमुळे हा आकडा २०२९ पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे! म्हणजे १६ लाख टनांपेक्षा जास्त!
मिथेन हा ‘हरितगृह वायू’ आहे. तो कार्बन डायऑक्साइड (CO₂) पेक्षा २५ ते ८० पट जास्त उष्णता वातावरणात धरून ठेवतो. यामुळे जागतिक तापमान वेगाने वाढते. हवामान बदल होतो – पूर, दुष्काळ, वादळे आणि उष्णतेच्या लाटा वाढतात. याशिवाय मिथेन स्फोटक असल्याने खाण कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

मिथेनचा धोका कमी करण्यासाठी..
- खाणींमध्ये असतानाच मिथेन वायू पकडून, टाकीबंद करून त्याचा वापर ऊर्जेसाठी करता येतो. कोळशाऐवजी सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि जलऊर्जा वापरली तर मिथेनची गळती थांबवता येईल. सरकार आणि कंपन्यांनी खाणी सुरक्षित आणि हरित बनवायला मात्र हव्यात.
- मुलंदेखील मिथेनचा धोका कमी करण्यासाठी काम करु शकतात. त्यासाठी विजेचा अनावश्यक वापर टाळा. झाडे लावा आणि रीसायकलिंग करा.
- घरात स्वच्छ ऊर्जा वापरायला हवी असा आग्रह आईबाबांकडे धरायला हवा.
- पर्यावरण जागृती ही आपली जबाबदारी आहे. चला, आजपासूनच पर्यावरण रक्षणाला सुरुवात करूया!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.oline/contact


