-डॉ. योगिता आपटे
भेदभाव करणाऱ्या शिक्षकांचं करायचं तरी काय? तर अश्या वेळी चक्क शाळेतल्या इतर चांगल्या शिक्षकांची मदत घ्यायची. शाळेत जसे चिडके शिक्षक असतात, तसे शांत, मुलांना समजून घेणारे शिक्षकही असतातच ना. तुमचं ज्यांच्याशी छान जमतं असे सर किंवा मॅडम असतील त्यांच्याशी या बाबतीत बोला. ते तुम्हाला मदत किंवा मार्गदर्शन करू शकतील.

पण तुम्हाला एक गंमत माहितीये का? भेदभाव करणाऱ्या शिक्षकांचा मुलांना ताण येतोच, पण त्याहून जास्त ताण कसला येतो माहितीये? मित्रमैत्रिणी नसण्याचा! कारण शाळेतले अनेक ताण असे असतात जे आपण मित्रमैत्रिणींशी बोलून हलके करू शकतो. पण आपल्याला जर सख्खे, जिवाभावाचे मित्रमैत्रिणी नसतील तर? असं होऊ शकतं. तुम्हाला जर स्वतःला मित्रमैत्रिणी असतील, तर तुम्हाला ते कदाचित लक्षात येणार नाही. पण तुमच्याही वर्गात अशी काही मुलं-मुली असतील ज्यांना स्वतःचा ग्रूप नाही. त्या मुलांची काय परिस्थिती होत असेल बरं? तुम्हाला आलेलं टेन्शन तुम्ही मित्रांशी किंवा मैत्रिणींशी शेअर करू शकता. त्यांना तर तेही करता येत नाही. आणि आपल्याला जवळचे मित्र नाहीत, आपला स्वतःचा ग्रूप नाही याचा सगळ्यात जास्त ताण शाळेतल्या मुलांना येतो.
पण काही मुलांना मित्र मैत्रिणी का नसतात? तर काही मुलांचा पटकन मैत्री करण्याचा स्वभाव नसतो. काही मुलं बुजरी असतात. त्यांना चटकन खूप बोलता येत नाही. अशा वेळी तुम्ही पुढे होऊन त्यांच्याशी मैत्री करता का? आपण आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जसे प्रयत्न करतो, तसे आपण इतरांचा विचार करतो का? आपण चांगले मित्र आहोत का? याचाही विचार केला पाहिजे.
कारण खूप वेळा वर्गात गटबाजी चालते. एखाद्या मुलाला किंवा मुलीला ठरवून एकटं पडलं जातं. आणि त्याचा त्या मुलाला / मुलीला जितका ताण येतो तेवढा तर त्यांना शिक्षकांनी केलेल्या पार्श्यालिटीचासुद्धा येत नाही. असं तुमच्या वयाची लहान मुलं का करतात? तर बहुतेक वेळा एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं शिक्षकांनी सारखं कौतुक केलं, की इतर काही मुलांना त्याचा त्रास होतो. मग ते म्हणतात, “तो स्वतःला फार शहाणा समजतो ना, मग बघेल त्याचं तो. आपण त्याच्याशी बोलायचंच नाही.” किंवा “ती मॅडमच्या फार पुढे पुढे करते. मग आपण कशाला तिच्याशी मैत्री करायची?” पण असं नसतं.
वर्गात सगळ्यात भाग घेणारी मुलं असतात तीही तुमच्यासारखीच मुलं असतात. त्यांनाही मैत्री करायची असते. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडवणं हे जसं आपल्यासाठी महत्वाचं असतं, तसं आपल्या वर्गातल्या इतर मुलांचा विचार करणं हेही महत्वाचं असतं. आपल्या वर्गातल्या मुलांना मैत्री करता येत नसेल, ते आपल्या शाळेत नवीन आलेले असतील, तर आपण त्यांना आपल्या ग्रूपमध्ये घेण्यासाठी हात पुढे केला पाहिजे.
शाळेत मुलांना येणाऱ्या ताणतणावाच्या मागचं अजून एक कारण म्हणजे शाळेत होणारं बुलिइंग!
बुलिइंग म्हणजे शाळेतल्या ताकदवान, मोठ्या मुलांनी एखाद्या मुलाला किंवा मुलीला ठरवून, एकटं पाडून त्रास देणं, भीती दाखवणं. तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना कोणी असा त्रास देत असेल, तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची. कितीही डेंजर वाटली, तरी तीही लहान मुलंच असतात आणि तुम्ही आईवडिलांची किंवा शिक्षकांची मदत घेऊन त्यांचा प्रश्न सोडवू शकता.
(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत.)
yogeeta.apte@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


