सुमाआजींनी मुलांना झाडावरून खाली उतरवलं आणि त्यांचं सगळं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं. आता त्या आपल्याला रागवणार असं मुलांना वाटायला लागलं तेव्हा त्या म्हणाल्या, “मी खरं सांगू का? झाड वाचवण्यासाठी तुम्ही जी धडपड केलीत तिला माझा पूर्ण पाठिंबा आहे!”

“म्हणजे?” अवनीने न कळून विचारलं, “तुम्ही आमचं नाव आईबाबांना सांगणार नाही?”
“अम्म्म्म… ते बघू आपण. तुम्ही मुलांनी एक झाड वाचवण्यासाठी इतके प्रयत्न केलेत याबद्दल मला तुमचं कौतुक करावंसं वाटतंय. पण ते करण्यासाठीचा तुमचा मार्ग चुकला असं तुम्हाला वाटत नाही का?”
जरा वेळ मुलं काहीच बोलली नाहीत. या आजी आता इथून पुढे आपल्याला रागवायला सुरुवात करतील की काय? अशी एक शंका त्यांच्या मनात येऊन गेली. पण आजींनी त्यांना रंगेहाथ पकडल्यामुळे पळून जाण्याचा मार्गही बंद होता. तिथेच थांबून आजींना उत्तर देणं भाग होतं. शेवटी आद्य म्हणाला,
“चुकला म्हणजे कसा आजी?”
“अरे, तुम्ही झाड वाचवलंत खरं… पण ते करतांना तुम्ही सरळ सरळ अंधश्रद्धेला खतपाणी घातलंत हे बरोबर आहे का?”
“पण आम्ही असं काहीच केलं नाही…” झेलमने शाळेतल्या सवयीप्रमाणे आधी सरळ नाही म्हणून टाकलं.
पण तरीही आजी काही चिडल्या नाहीत. त्या म्हणाल्या, “नाही कसं? तुम्ही सगळ्या सोसायटीत असं पसरवलंत की आंब्याच्या झाडावर भूत आहे. खूप लोकांना ते खरं वाटलं, लहान मुलं इकडे खेळायला यायची बंद झाली, आणि प्रत्यक्षात इथे भूत आहे का?”
“नाही!” तिघं म्हणाले.
हेही वाचा!
आजींनी पकडली आंब्याच्या झाडावरची भूतं.आत्ता पुढे काय होणार?
“म्हणजेच तुम्ही लोकांच्या मनात खोट्या भुताबद्दल भीती निर्माण केलीत. आणि त्या खोट्या भीतीमुळे तुम्ही सोसायटीतल्या लोकांचं जास्त नुकसान कराल.”
हे सुमाआजीचं म्हणणं खरं म्हणजे मुलांच्या डोक्यावरून गेलं. पण आजी इतकं सिरियसली सांगत होत्या की त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. पण शेवटी अवनीला काही राहवलं गेलं नाही. ती म्हणाली,
“पण आजी आम्ही सांगायला गेलो असतो ना, तर आमचं कोणीच ऐकलं नसतं…”
त्यावर अर्धवट खिन्न हसून आजी म्हणाल्या, “अगं तुमचं काय, माझं सुद्धा कोणी ऐकलं नाही त्या दिवशी मीटिंगमध्ये.”
“तुम्ही बोलला होतात मीटिंगमध्ये?” आद्यने आश्चर्याने विचारलं.
“हो. मी एकटीच म्हणाले की झाड पाडायला माझा विरोध आहे. पण बाकी कोणी ऐकलं नाही.” सुमाआजी म्हणाल्या.
“मग???” झेलमने विचारलं.
“मग काय? त्या मीटिंगमध्ये झाड पाडायचा निर्णय फायनल झाला.”
“म्हणजे सुमाआजी, आम्ही जे केलं तेच बरोबर होतं ना? कारण नीट सांगून पण कोणी ऐकलंच नाही तर काय उपयोग?”
“असं नसतं…” सुमाआजी म्हणाल्या, “तुमचा उद्देश बरोबर होता, पण मार्ग चुकला.”
“हम्म…” अवनी म्हणाली, “पण मग आता काय करायचं?”
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


