आजींनी पकडली आंब्याच्या झाडावरची भूतं.आत्ता पुढे काय होणार?

Image: freepik

सुमाआजींनी गाडी लावली आणि त्या गाडीतून खाली उतरल्या. त्यांनी गाडी लॉक केल्याबरोबर तीनही मुलांनी एकमेकांकडे बघितलं आणि एका आवाजात ओरडायला सुरुवात केली, “उऊऊऊऊऊऊउ”... झाडाच्या फांद्या हलायला लागल्या, पांढरं घुबड आजींच्या कानाजवळून उडत गेलं. अजून आजी शांतपणे आहे तिथेच उभ्या होत्या. जरा वेळ वाट बघून मुलं परत एकदा ओरडली, “उऊऊऊऊऊउ…”

मग मात्र आजी जागच्या हलल्या. पण घाबरून सोसायटीच्या दिशेला पळत जाण्याच्या ऐवजी त्या सरळ आंब्याच्या झाडाकडे चालत आल्या. त्या झाडाच्या अगदी खाली येऊन उभ्या राहिल्या आणि वर बघून म्हणाल्या,

“कोण कोण जाऊन बसलंय तिकडे झाडावर? चला सगळ्यांनी पटकन खाली या.”

आपण पकडले गेलो आहोत हे लक्षात आल्यावर आद्य, झेलम आणि अवनीच्या अंगाला दरदरून घाम फुटला. तिघं आहेत तिथेच अजून अंग चोरून बसले. एव्हाना सात वाजून गेले होते. चांगलाच अंधार पडला होता. या बाजूला एकच दिवा होता आणि तोही जरा लांब होता. त्यामुळे खालून आजी आपल्याला ओळखू शकणार नाहीत याची त्यांना खात्री होती.

 

हेही वाचा!

माणसं नरमली गाड्या हलल्या, मुलं खूष झाली. पण..

बरं त्या इतक्या जवळ उभ्या होत्या की आता काय करायचं याबद्दल त्यांना काही चर्चा पण करता येईना. पण तिघांनी आपोआप मनातल्या मनात असं ठरवलं की त्या जरा वेळाने कंटाळून निघून जातील तोवर इथेच गपचूप बसून राहू…

आजींनी पाच मिनिटं वाट बघितली आणि वर झाडाकडे बघत त्या म्हणाल्या, “तुम्ही खाली येताय का मी वर येऊ? मला येतं झाडावर चढायला…!”

१० मिनिटं झाली, वीस मिनिटं झाली, तरी सुमाआजी झाडाखालून हलेनात म्हंटल्यावर आद्य, झेलम आणि अवनीला खरोखर घाम फुटला. आता त्यांना काहीही करून खाली उतरायलाच लागणार होतं. अजून थोड्या वेळाने त्यांचे आईबाबा पण शोधायला आले असते. आणि त्यांना जर हे कळलं असतं तर या तिघांना त्यांनी खरोखर धोपटलं असतं. शेवटी तिघांनी एकमेकांकडे बघितलं, मनाचा हिय्या केला आणि अंगावरची काळी ओढणी काढून टाकली. एव्हाना चांगलाच अंधार झाला होता.

image : shutterstock

आधी झेलम, मग अवनी आणि सगळ्यात शेवटी आद्य झाडावरून खाली उतरले आणि सुमाआजींसमोर खाली मान घालून उभे राहिले.

“हम्म…” सुमाआजी हाताची घडी घालून तिघांकडे आलटून पालटून बघत म्हणाल्या, “तर तुम्ही तिघं आहात आंब्यावरची भुतं…”

अजूनही मुलांना आजींचा अंदाज येत नव्हता, त्यामुळे ती मान खाली घालून गप्प उभी होती. शेवटी आजींनीच परत विचारलं,

“का केलंत तुम्ही असं?”

उत्तर देण्याची संधी मिळाल्याबरोब्बर तिघांनी एकदम बोलायला सुरुवात केली.

“ऍक्च्युअली ना आजी…”

“मोठ्या माणसांनी झाड तोडून टाकायचं ठरवूनच टाकलं.”

“त्यावर किती प्राणी, पक्षी आणि किडे राहतात.”

“सगळ्या प्राण्यांनी सांगितलं की ते परत कोणाच्याच गाडीवर घाण करणार नाहीत.”

“आणि त्यांनी खरंच अज्जिबात घाण केली नाही.”

“तरी त्या काकांनी झाड तोडणारा माणूस बोलावला…”

“मग आम्ही तरी दुसरं काय करणार?”

“असं कसं झाड तोडू द्यायचं?”

“झाडाची काय चूक आहे त्यात?”

“आमची ढाक आहे ती.”

“आम्हाला शाळेत शिकवतात की झाडं आपल्याला प्राणवायू देतात, सावली देतात.”

“मग झाड तोडणं चुकीचं आहे ना…”

image : freepik

“म्हणून मग आम्ही असं केलं…”

“मुद्दाम घाबरवायला नाही केलं…”

“पण आमचं कोणी ऐकलंच नसतं, म्हणून…”

“हो आजी, आमचं कधीच कोणी ऐकत नाही…”

एवढं सांगितलं तरी सुमाआजी काहीच बोलेनात. मग मुलांना अजूनच भीती वाटायला लागली.

“सॉरी आजी…”

“हो आजी, आमचं चुकलं.”

“आम्ही परत असं नाही करणार.”

“प्लीज आईबाबांना सांगू नका.”

शेवटी आजींनी हाताची घडी सोडली आणि त्या मुलांना म्हणाल्या, “मी खरं सांगू का?”

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact