
Image: d23.com
कोणी जंगलातल्या गोष्टी सांगू लागलं की लगेच आपले कान टवकारतात. जंगल, जंगलातले प्राणी, झाडं, नदी नाले या सगळ्यांबद्दल आपल्याला प्रचंड कुतुहल असतं. जंगलातली सकाळ, संध्याकाळ, रात्र कशी असते? सूर्य उगवतो तेव्हा जंगलात काय घडतं? झाडं, फुलं, पक्षी, किटक हे सर्व एकमेकांशी कशी वागतात? ती दिवसभर काय करतात? नुसतं जंगलात राहून ती बोअर होत नाही का? असे किती प्रश्न आपल्याला जंगलाबद्दल पडतात. अशा या जंगलातल्या झाडा फुलांची, पक्षी किटकांची आनंदी गोष्ट सांगणारी फिल्म पाहायला मिळाली तर किती धम्माल येईल ना? फ्लाॅवर्स ॲण्ड ट्रीज ही फिल्म आपल्याला जंगलातली आनंदी गोष्ट सांगते. जंगलातलं प्रसन्न चित्र दाखवते.
हेही वाचा!
फ्लाॅवर्स ॲण्ड ट्रीज ही फिल्म आपल्याला जंगलातल्या झाडा फुलांमधल्या नात्याची गोष्ट सांगते. जंगलातली झाडा फुलांची पक्षी किटकांची सकाळ कशी असते? हे दाखवते. एखादं संकट येतं तेव्हा छोट्यातला छोटा किटक, पक्षीही त्या संकटाशी लढताना आपलं काय योगदान देतं हे दाखवते. हे सर्व विना संवाद केवळ संगीताच्या पार्श्वभूमीवर सुरु असतं. ७ मिनिटांची ही फिल्म कधी सुरु होते आणि कधी संपते हे लक्षातही येत नाही. एक मिनिटही आपण आपलं लक्ष त्या जंगलातल्या झाडा फुलांवरुन, पक्षी किटकांवरुन बाहेर काढू शकत नाही. वाॅल्ट डिस्ने हे नाव तुम्हाला कार्टूनमुळे चांगलच माहिती असेल ना. या वाॅल्ट डिस्नेची फ्लाॅवर्स ॲण्ड ट्रीज ही फिल्म पहिली रंगीत ॲनिमेटेड फिल्म आहे. १९३२ मधली ही फिल्म असली तरी कोणी कोणत्याही काळात पाहिली तरी ती जुनी वाटत नाही. या फिल्मचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या फिल्मला बेस्ट ॲनिमेशन फिल्मचा पहिला ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
काय आहे फ्लाॅवर्स ॲण्ड ट्रीज'ची गोष्ट?
फ्लाॅवर्स ॲण्ड ट्रीज या ॲनिमेशन फिल्ममध्ये झाडा फुलांची पक्षी किटकांची गोष्ट आहे. या गोष्टीत आनंद, राग, संकट, पळापळ, सकंटाविरुध्द लढणं आणि पुन्हा झाडा फुलांचं पक्षी किटकांचं एकत्रित शांत आणि आनंदी जगणं असं सर्व काही आहे.
फिल्मची सुरुवात होततीका प्रसन्न सकाळने. सूर्य उगवतो. झोपलेली झाडं उठू लागतात. आळस झटकतात. कोणी व्यायाम करत तर कोणी झऱ्यातल्या पाण्यानं चेहेरा धुवून प्रसन्न होतं. एक आजोबा झाड आपल्या अंगा फांद्यावर पक्ष्यांना घेवून छान संगीत वाजवत सगळी सकाळ प्रसन्न करतात. तिथे दोन तरुण झाडं असतात. एक पुरुष आणि एक स्त्री झाड. त्या दोन झाडांचं एकमेकांवर प्रेम असतं. पण त्या सुंदर स्त्री झाडानं आपल्याकडे पाहावं , आपली दखल घ्यावी असं एका वठलेल्या, निष्पर्ण झालेल्या झाडाला वाटत असतं. पण तसं काही होत नाही. आणि मग ते झाड चिडतं. क्रोधाने पेटून उठतं. आग लावतं. आग झरझर पसरायला लागते. झाडं घाबरतात, पक्षी, किटक सैरावरा पळत सुटतात. अख्खं जंगल कवेत घेवू पाहणाऱ्या आगीला विझवण्यासाठी पक्षी किटक आपली ताकद आणि कौशल्य पणाला लावतात. आग विझते आणि ज्या झाडामुळे ती आग लागते ते झाड जळून जातं. मग सगळीकडे आनंदी आनंद होतो. प्रेम करणाऱ्या त्या दोन झाडांच्या आनंदात सगळी झाडं, फुलं, पक्षी, किटक गुंग होवून जातात.

Image: d23.com
फ्लाॅवर्स ॲण्ड ट्रीजची ही गोष्ट वाचून जितका आनंद मिळतो तितकाच आनंद आणि मजा ही फिल्म पाहाताना मिळते. केवळ संगीताच्या सोबत पुढे जाणारी गोष्ट आपल्याला खिळवून ठेवते आणि डोळ्यासमोरचं हे जंगल, तिथली झाडं, फुलं, पक्षी, किटक आपल्या डोळ्यासमोर तसेच कायम राहावेत असं वाटत राहातं. ही फिल्म बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.youtube.com/watch?v=Jkh5ojRXKYM
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact