
मागच्या वर्षी मला अभ्यासात खूप अडचणी यायच्या. आई म्हणायची शाळेत शिक्षकांना विचार. पण मला शिक्षकांना प्रश्न विचारण्याची भीती वाटते. मी काय करु?- सारंगी, नवापूर.
-आपण अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी शिक्षकांना विचारायची भीती वाटते हे साहजिक आहे. बहुतेक सगळ्याच मुलांना अशी भीती वाटते. शिक्षक ओरडतील, मारतील किंवा शिकवताना लक्ष कुठे असतं असं विचारतील म्हणून अशी भीती वाटते, हो ना? पण तुला एक गंमत सांगू का? शिक्षकांना शंका विचारणारे विद्यार्थी खूप आवडतात. ज्या मुलांना शंका येतात ती मुलं खरोखर अभ्यास करतात असं शिक्षक मानतात. त्यामुळे शंका विचारणारे विद्यार्थी शिक्षकांच्या चांगले लक्षात राहातात.
-शंका विचारणं, जे येत नाही ते नीट समजून घेणं हा चांगल्या विद्यार्थ्याचा गुण आहे. त्यामुळे तू शंका विचारलीस तर शिक्षक तुझ्यावर रागावणार नाहीत. उलट तुला नीट कळेपर्यंत एखादा विषय तुला समजावून सांगतील. त्यामुळे न घाबरता बिनधास्त आपल्या शंका शिक्षकांना विचारायला काहीच हरकत नाही.
हेही वाचा!
एक चांगली व्यक्ती होण्यासाठी काय करावं लागेल?
-एखादा विषय शिकवून झाला की शिक्षक आपल्याला विचारतात, शिकवलेलं सगळ्यांना नीट कळलं का? कुणाला काही शंका असेल तर विचारा. आपण विचारलं नाही तर त्यांना वाटतं आपल्याला सगळं कळलंय. त्यामुळे आपल्याला शंका आली तर ती विचारायलाच हवी. शंका विचारायला आपण घाबरलो तर आपण आपलंच नुकसान करुन घेऊ हे लक्षात ठेव.
- प्रश्न विचारणे, शंका विचारणे याचा अर्थ तुला विषय किंवा शिकवलेलं कळलेलं नाही असा होत नाही. उलट शिक्षक जे शिकवत आहे ते तू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यात काही अडचण आली तर प्रश्न विचारणं ही योग्य बाब आहे. त्यामुळे प्रश्न विचारला म्हणजे आपल्याला काही समजलेलं नाही असं वाटून शिक्षक ओरडतील अशी भीती तू अजिबात बाळगू नको.
- प्रश्न पडला की तो तेव्हाच्या तेव्हा विचारला पाहिजे. त्यामुळे आपल्या शिकण्यातल्या,समजण्यातल्या अडचणी वेळच्या वेळी दूर होतात. शिवाय तू प्रश्न विचारल्याने इतरांचाही फायदा होतो. तुझी शंका दूर करताना इतरांनाही तो विषय पुन्हा समजून घेण्याची संधी मिळते.
- प्रश्न विचारणं हा शिकण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तू जितके जास्त प्रश्न विचारशील तितकं तुझं आकलन पक्क होईल हे लक्षात घे!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


