-डॉ. योगिता आपटे

Image: .freepik
लहान मुलांनाही अनेक गोष्टींचं टेन्शन येऊ शकतं. तसं ते अनेकदा येतंही. काही वेळा हा ताण तेवढ्यापुरता असतो आणि मग तो जातो. पण काही वेळा मात्र सतत तणावाखाली राहिल्यामुळे मुलांचं फार नुकसान होऊ शकतं. शिवाय या टेन्शनचा सगळ्यात मोठा लोचा काय असतो माहितीये का? की एखादा मुलगा जे करतोय ते टेन्शनमुळे करतोय हेच मुळी कोणाला समजत नाही. म्हणजे बघा हं, समजा घरी पप्पा अचानक खूप चिडचिड करायला लागले तर आई काय म्हणते, 'त्यांना ऑफिसचं टेन्शन असेल.' बरोबर ना? पण जर का सहावीतला मुलगा अचानक खूप चिडचिड करायला लागला तर काय होतं? सगळे म्हणतात, 'हल्ली फार आगाऊ झालाय तो.' ही चीटिंग आहे यार. पप्पांना टेन्शन असतं तर मुलांना असू शकत नाही का? तर नक्कीच असू शकतं. पण होतं काय? की मुलांना असं टेन्शन येतं हेच मुळी मोठ्या माणसांना माहिती नसतं. पण टेन्शन आलं की आपल्या वागण्यात, सवयीत बदल होतो, जो आपण सहज ओळखू शकतो. हे बदल टिपून तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणीलाही कसलं टेन्शन आलं का हे ओळखू शकता.
हेही वाचा!
वागण्यात काय बदल होतो?
१. सतत चिडचिड होते.
२. उदास वाटतं, निराश वाटतं.
३. छोट्याशा गोष्टींवरुनही रडायला येतं.
४. कोणतंही काम करताना आपल्याला हे जमणार नाही असं वाटायला लागतं. आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो.
५. उसनं अवसान आणणं. खोटं खोटं वागणं.
६. कामाचा, अभ्यासाचा कंटाळा येणं. त्यात चालढकल करणं.
७. कामात, अभ्यासात, खेळात अजिबात लक्ष न लागणं, एकाग्रता नसणं
८. शारीरिक कुरबुरी वाढणं, सतत हे दुखतं, ते दुखतं असं होणं.
९. मित्रांमध्ये न मिसळणं.

सवयींमध्ये होणारे बदल
१. अचानक नेहेमीच्या स्वभावात बदल झालेला लक्षात येतो.
२. अंगठा चोखणे
३. सतत एखादी ठराविक वस्तू हाताळणे.
४. रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांनाही फार भावनिक (इमोशनल) रिॲक्शन देणं.
छोट्या छोट्या गोष्टींवरुन खूप रागावणं किंवा संतापणं.
५. भुकेच्या सवयींमध्ये बदल होतो. नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त भूक लागते.
६. झोपेच्या सवयींमध्ये बदल होतो.
आता ही सगळी लक्षणं अशी आहेत ना, की ती इतर कारणांनी दिसू शकतात, किंवा टेन्शन आल्यामुळेही दिसू शकतात. पण कुठल्याही कारणाने तुमच्या किंवा तुमच्या मित्राच्या वागण्यात हा बदल होत असेल, तर तुम्हाला मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे हे नक्की!
yogeeta.apte@gmail.com
(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशिका आहेत.)
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact