
Image: houstonzoo
नको जास्त व्यायाम करु फक्त ५ सूर्यनमस्कार तरी रोज घाल. असं आपले आई-बाबा आपल्याला रोज सांगतात, पण आपण मात्र ढिम्म असतो. अजिबात ऐकत नाही. व्यायाम करायचा म्हटला की रोज बहाणे शोधून काढतो. पण तुम्हाला जर एका प्राणिसंग्राहालयातल्या हत्तींचं उदाहरण दिलं तर तुम्हाला रोज दहा मिनिटं का होईना पण व्यायाम करण्याची प्रेरणा मिळेल.
हत्तींमुळे व्यायामाची प्रेरणा.. ती बरं कशी? तर हे हत्ती रोज स्वत: योग करतात, न चुकता. दिवसातून एकदा दोनदा नव्हे तर अनेकवेळा हे हत्ती योगचा सराव करतात. हे वाचून कौतुकच वाटलं असेल ना या हत्तींचं. हे असे योग करणारे हत्ती कुठे असतात बरं? तर हे हत्ती आहेत अमेरिकेतील टेक्सास राज्यातील हाॅस्टन झू मधील.
या हाॅस्टन झू प्राणिसंग्राहालयाचा परिसर ५५ एकरचा भला मोठा आहे. इथे ६०० प्रजातींचे ६००० प्राणी आहेत. या प्राणिसंग्राहालयाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. हाॅस्टन झू मधील योग करणारे १२ आशियाई हत्ती हे पर्यटकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. इतकंच नव्हे तर योग करतानाच्या या हत्तींच्या व्हिडीओनांही सोशल मीडियावर खूप व्ह्यूज आणि लाइक्स मिळतात. न चुकता दिवसातून अनेक वेळा योग करणारे हे हत्ती आहेतच मुळी गुणाचे.
हेही वाचा!
योगचा न चुकता सराव करणं हा हाॅॅस्टन झू मधील हत्तींच्या दीनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. या हत्तींची व्यवस्था बघणारे, त्यांची काळजी घेणारे या हत्तींकडून रोज योगचे धडे गिरवून घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या हत्तींनी योग प्रशिक्षण घेतलं आहे. हाॅस्टन झूमधील ४० वर्षीय टेस नावाची हत्तीण आहे. तिचं वजन आहे ६,५०० पौंड. पण ही हत्तीण आपल्या संपूर्ण शरीराचं वजन पुढच्या दोन पायांवर सहज पेलू शकते. येथील सर्व हत्तींपैकी टेस ही योगचा सराव करण्यात सर्वात पुढे असते. तिचं अंग योग केल्यानं अगदी लवचिक झालं आहे. रोज योगचा सराव केल्याने हाॅस्टन झू मधील सर्व हत्तींच्या हालचाली वेगानं होतात.
हत्तींंचा योग सराव घेतल्याने या हत्तींचं आणि त्यांच्या व्यवस्थापकांचं नातं घट्ट झालं आहे. शिवाय हत्तींचा योग सराव घेताना या व्यवस्थापकांना या हत्तींचं बारकाईनं निरीक्षण करता येतं. त्यांची त्वचा, त्यांचे पाय, तोंडाचा आतील भाग, त्यांच्या हालचाली हे सर्व तपासता येतं. या हत्तींच्या हालचालींवरुन या व्यवस्थापकांना या हत्तींना योग प्रशिक्षणामुळे कसं वाटतं याचाही अंदाज घेता येतो.
हत्ती जेव्हा जन्माला येतात तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून या हत्तीचं योग प्रशिक्षण सुरु होतं. सुरुवातीला या हत्तींना एक नाव दिलं जातं. त्या नावाने हाक मारुन त्यांच्या जवळ, त्यांच्या अंगाला स्पर्श करणं यामुळे या हत्तींना आपल्या नावाची ओळख होते. या हत्तींचा ३० सेकंद ते पाच मिनिटं योग सराव घेतला जातो. आता येथील हत्तींना शिकवलेल्या योगचा इतका सराव झालेला आहे की हे हत्ती आपलं अंग मोकळं करण्यासाठी अनेकवेळा योगचा सराव करतात. योग केल्यानंतर या हत्तींना बक्षीस म्हणून केळ किंवा ब्रेड खायला दिलं जातं.

Image:nypost
हेही वाचा!
योग कराच असा काही आग्रह येथील व्यवस्थापक हत्तींना करत नाही. एकदा योग यायला लागला की हत्ती स्वत:हून अनेक वेळा योग करतात. ज्या हत्तींना कंटाळा आलेला असतो ते योग करणाऱ्या हत्तींच्या बाजूने दुसरीकडे निघून जातात. पण म्हणून या हत्तींना कोणी शिक्षा करत नाही. पण योग न करणाऱ्या हत्तींना हे माहीत असतं की आपण योग केला नाही तर आपल्याला बक्षीस म्हणून मिळणारं केळ किंवा ब्रेड मिळणार नाही.

Image: houstonzoo
पुढच्या पायावर शरीर तोलणे, मागचे आणि पुढचे पाय ताणणे, खाली बसून अंग ताणणे अशा अनेक योग हालचाली हे हत्ती सहज करतात. योग केल्याने शरीराची सतत हालचाल करण्याची सवय या हत्तींना लागली आहे. त्यामुळे हे हत्ती उड्या मारतात, पळतात, खाली पडून लोळून घेतात. कोणतीही वस्तू सोंडेने आपल्या पाठीवर फेकण्याचा खेळ खेळतात.
योगचा नियमित सराव केल्याने येथील हत्तींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम आहे. हे हत्ती कायम आनंदी असतात असं त्यांची काळजी घेणारे व्यवस्थापक सांगतात.
हाॅस्टन झू मधील प्रत्येक हत्तीचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. येथे दोन वर्षाचा टेडी नावाचा हत्ती आहे. त्याला आपले बाॅडी पार्टस ओळखता येतात. एका काडीला टेनिस बाॅल बांधून त्या बाॅलने त्यांच्या अंगाला विविध ठिकाणी स्पर्श करुन त्याच्या व्यवस्थापकांनी हत्तींना बाॅडी पार्टसची ओळख करुन दिली आहे.
येथील ५४ वर्षांची मेथाई नावाची हत्तीण आहे. तिला संधिवाताचा आजार असल्याने सर्व हत्तींच्या तुलनेत फक्त तिच्या हालचाली मंद आहेत. बाकी सर्व हत्ती रोज योगचा सराव केल्याने चपळ झाले आहेत. योगच्या नियमित सरावामुळेच हे हत्ती सतत नवीन काही शिकण्यास उत्सुक असतातत, असं येथील व्यवस्थापक सांगतात.
कसे वाटले तुम्हाला हे योगचा सराव करणारे हत्ती?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact