एकट्याने घरी थांबायची वेळ आली तर हुशारीने वागा! म्हणजे कसं?

images : freepik

आईवडील घरी नसतांना तुम्ही एकटेच घरी कधी थांबला आहात का? दिवसभर? किंवा संध्याकाळी शाळेतून आल्यावर? कधी शेजाऱ्यांकडून किल्ली घेऊन आपलं आपण दार उघडलं आहे का? तुम्ही १०-१२ वर्षांपेक्षा मोठे झालात, की आईवडील तुमच्यावर केव्हातरी अशी जबाबदारी टाकू शकतात. कधीतरी त्यांना काम असतं, कुठेतरी जाऊन यायचं असतं पण तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकत नाही. अशा वेळी आपण काय काय काळजी घ्यायची असते असा तुम्ही कधी विचार केला आहे का? दार नीट लावून घे हे तर सगळेच सांगतात, पण त्यापलीकडे आपली सुरक्षितता जपण्यासाठी आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.

 

हेही वाचा!

मुलग्यांना घरकाम करायला सांगत नाही. मुलींनीच का करायची कामं?

  • अनोळखी लोकांना दार उघडू नका.
  • आईवडील दिवसभर घरी येणार नाहीत असं कोणालाही सांगू नका. अगदीच कोणी विचारलं तर ‘इथेच गेले आहेत, येतील जरा वेळात’ असं सांगा.
  • गॅस आणि गीझर बंद आहे ना याकडे लक्ष द्या. 
  • कात्री, सुरी, स्क्रू ड्रायव्हर अशा धार असणाऱ्या आणि इजा होऊ शकणाऱ्या वस्तू दूर ठेवा.
  • मित्रमैत्रिणींना परस्पर घरी बोलावू नका.
  • तुम्ही परस्पर कोणाकडे खेळायला किंवा अभ्यासाला जाऊ नका.
  • घरात खेळताना आपण कुठेतरी धडपडणार नाही, आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
  • घराला लॅच असेल तर तुम्ही बाहेर जाऊन ते दार आपोआप बंद होऊ नये याची काळजी घ्या.
  • गरज पडली तर कोणाला फोन करायचा त्यांचे नंबर्स आईवडिलांकडून घेऊन ठेवा.
  • आईवडील घरी नसतील तरी पूर्ण वेळ टीव्ही लावून बसू नका. थोडा अभ्यास करा, पुस्तक वाचा, चित्र काढा किंवा इतर काहीतरी तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. 

यासारख्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीत तर आईवडील गरजेच्या वेळी तुम्हाला एकट्याला घरी ठेऊन बाहेर जाऊ शकतील. तुम्ही मोठे झाले आहात अशी त्यांनाही खात्री वाटेल. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact