
Image: freepik
याला काय अर्थ आहे? मुलींना घरातली कामं करता येतात. मुलग्यांना मात्र येत नाहीत. माझा भाऊ आठवीत आहे, पण त्याला चहा सुद्धा करता येत नाही. असं का?
- सायली, जळगाव
अतिशय महत्वाचा आणि अतिशय अवघड प्रश्न विचारला आहेस. तुला ज्या अर्थी हा प्रश्न पडतोय त्याअर्थी आता जे सांगणार आहे ते तू समजून घेऊ शकशील. आपला समाज स्त्री पुरुष समानता न मानणारा आहे. म्हणजे, स्त्री आणि पुरुषांना समान वागणूक देणारा, समान हक्क देणारा नाही. आणि ही असमानता घरातून सुरु होते. मुलींसाठी गुलाबी रंग, मुलांसाठी निळा रंग इथपासून सुरु होते. त्यात स्वयंपाकघर हे फक्त बायकांचंच क्षेत्र मानल्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला आहे. पूर्वी म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी पर्यंत बायका आजच्या इतक्या बाहेर काम करायला जात नसतं. त्यांनी घरकाम करावं अशीच सगळ्यांची अपेक्षा असायची. त्यामुळे मुलींना सगळं यायला हवं असं मानून स्वयंपाक आणि घरकाम शिकवलं जायचं. मुलांनी हे करायचं नाही हे गृहीत असल्याने मुलांना घरकामातलं काहीच शिकवलं जायचं नाही.
पण काळ बदलला तसं बायका घराबाहेर पडल्या. नोकऱ्या करू लागल्या. उच्च पदांवर काम करू लागल्या. पण त्या जशा घराबाहेर पडल्या तसे घरातल्या पुरुषांनी मात्र घरकामात लक्ष घातलं नाही. तशी त्यांच्याकडून स्त्रियांनीही अपेक्षा केली नाही. त्यामुळे समाजाचं चित्र बदललं तरी घरकामात पुरुषांचा सहभाग वाढला नाही.
हेही वाचा!
आजही अनेक घरांतून मुलग्यांनी घरकाम करायचं नाही असं मानलं जातं त्यामुळे त्यांना चहा करणं, कुकर लावणं, केर काढणं, भांडी धुणं यासारख्या अगदी बारीक सारीक घरकामाचा गोष्टी देखील करता येत नाहीत. पण आज मुलींनीच फक्त घरकामात लक्ष घालावं आणि मुलांनी नाही असा विचार करुन चालणार नाही. आज शिक्षणाच्या निमित्ताने मुला मुलींना एकट्याने बाहेर राहायला लागतं. शिक्षणाचा खर्च, राहण्याचा खर्च इतका होतो की घराबाहेर राहातो म्हणून बाहेरचं खातो असं म्हणून चालत नाही. त्यापेक्षा आपल्या हातानं जेवण बनवणं हे स्वस्तही पडतं आणि आरोग्यदायीही. स्वतंत्रपणे राहताना आपल्याला आपली जबाबदारी पेलता यावी यासाठी आपले कपडे धुण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व गोष्टीत स्वावलंबन मुला मुलींनी शिकणं ही आताच्या काळाची गरज आहे.

Image: pinterest
घरकामाबाबत मुला मुलींमध्ये दिसणारं हे फरकाचं हे चित्र आता काळानुसारा आणि गरजेनुसार बदलायला हवं. तू याची सुरुवात करू शकतेस. आईला सांग भावालाही घरकाम शिकवायला. कदाचित ती सुरुवातीला नाही म्हणेल, रागवेल पण प्रेमाने दोनचारदा सांगितलंस तर ऐकेल. तिला ऊर्जा वाचायला सांग. तुझ्या भावालाही वाचायला सांग म्हणजे त्यालाही घरकामाचं महत्व समजेल आणि तो स्वत:हून कदाचित करायला लागेल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact