
हाय ऊर्जा!
मला ना माझ्या आईवडिलांना एक गोष्ट सांगायची आहे. पण मी काही सांगायला गेले की ते म्हणतात की तू फार आगाऊ झाली आहेस. पण मला ती गोष्ट नाही म्हणजे नाहीच आवडत. तर ते मी आईवडिलांना कसं सांगू?
किंवा एक काम कर ना, तूच सांग त्यांना. म्हणजे काय आहे सांगू का तुला? आमच्याकडे ना सारखे कोणी ना कोणी नातेवाईक येतात. कधी वडिलांचे ऑफिसमधले लोक येतात. आणि त्यातले खूप लोक “कित्ती गोड दिसते ही!”असं म्हणतात आणि माझा गालगुच्चा घेतात. ते मला अजिबात आवडत नाही. नातेवाईकांना सांगा आमचा गालगुच्चा घेऊ नका, मला नाही आवडत असं केलेलं.
मी त्यांना तसं स्पष्ट सांगितलं तर नंतर आई मला सॉलिड रागावली. म्हणे, “मोठ्या माणसांना असं उलट उत्तर द्यायचं नाही.” वडील पण चिडले. आजी म्हणाली, “ती एवढ्यात जादा आगाव झालीय.” मग मी आईला म्हंटलं, “तू लोकांना सांग की मला आवडत नाही गालाला हात लावलेला.” तर ती तेवढ्यापुरतं हो हो म्हणते. पण आमच्याकडे परत पाव्हणे येतात तेव्हा ती त्यांना काहीच सांगत नाही.
हेही वाचा!
आम्ही छान खेळत असलेलो आई बाबांना आवडत नाही का?
मी काय आता लहान आहे का? इतर वेळी आईवडील आणि आजी पण म्हणतात की ‘तू काय आता लहान आहेस का? सहावीत गेलीस. आता शहाण्यासारखं वाग.’ मग माझे लहान मुलांसारखे गाल ओढतात तेव्हा कसं चालतं त्यांना? तर आता मी हे आईवडिलांना कसं सांगू? तूच सांगशील का प्लीज? म्हणजे मला कोणी आगाऊ म्हणणार नाही.
प्लीज माझं नाव छापू नकोस. नाही तर त्यावरून पुन्हा लेक्चर देत बसतील सगळे. पण माझं पत्र नक्की छाप.
थँक यू!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?


