
Image:.freepik
महाराष्ट्रात पावसाळा येऊन दाखल झाला त्याला आता काही दिवस झाले. तुमच्याकडेही पाऊस सुरू झाला असेल. त्यामुळे उकाडा कमी झाला असेल, आपण निबंधात लिहितो तसं सगळा निसर्ग हिरवागार वगैरे व्हायला लागला असेल, पण…
हा निसर्ग हिरवागार होण्यापूर्वी सगळीकडे जो भयंकर चिखलराडा होतो, त्याचे दिवस आत्ता सुरू आहेत. तर, या काळात माझा प्रश्न असा आहे, की या सॉलिड चिखलातून तुम्ही कशी वाट काढता? म्हणजे कसं सांगू का? चिखलातून मार्ग काढण्याच्या दोन तीन पद्धती असतात. त्यातली पहिली पद्धत म्हणजे रस्त्यावर चिखल आहे याची कुठलीही दखल न घेता सरळ त्यातून चालत जाणारे वीर. हे जगातील सगळ्यात सुखी जीव असतात. यांच्या पाठीवर कायम चिखलाच्या ठिपक्यांची रांगोळी असते. पण त्याचं त्यांना काहीच वाटत नाही. घरी गेल्यावर त्यांचे कपडे आणि त्यातील पोरगं यांची एकदमच धुलाई होत असणार ते सोडा. पण या लोकांना चिखल दिसतच नाही.
दुसरा प्रकार म्हणजे त्यातल्या त्यात चिखलाच्या कडेकडेने चालणारे. यांना खरं म्हणजे चिखलात अजिबात पाय घालायचा नसतो. पण जर का दुसरा रस्ता नसेल, तर हे लोक्स नाईलाजाने का असेना, पण चिखलात पाय ठेवतात. हे मधातल्या रस्त्यावरून चालतात.
आणि तिसरा प्रकार म्हणजे चिखल दिसला की जागीच यूटर्न मारणारे. हे लोक रस्ता बदलतील, लांबून जातील, बोलणी खातील, पण चिखलात पाय ठेवणार नाहीत. कधीकधी असं होतं, की त्यांना परत जाणं शक्य नसतं, आणि शाळेत किंवा शाळेतून घरी जायला बिनचिखलाचा रस्ता नसतो. अश्या वेळी हे लोक्स काय करतात? तर जीव मुठीत धरून चिखल पार करतात. आणि मग? मग आधी चपला धुतात, मग चपला निथळायला उभ्या करून ठेवतात, मग पाय धुतात… म्हणजे पाऊल, टाचा, पोटऱ्या असं गुढग्यापर्यंत पाय धुतात. मग हात धुतात, तेही कोपरापर्यंत! मग अंगातला रेनकोट काढतात. त्यावर मागे किती चिखल उडालाय ते बघतात. त्यावर वेडीवाकडी तोंडं करतात. मग तो रेनकोट नीट पसरून खुंटीवर किंवा दारावर वाळत घालतात. या लोकांना सगळीकडे किटाणू दिसतात, हे कायम हात धुतात.

Image: .freepik
तुमच्याही आजूबाजूला असे लोक्स असतील, तर ते कुठल्या प्रकारात मोडतात? आणि तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता? चिखलाच्या ठिपक्यांची रांगोळी, मधातला रस्ता का किटाणू?

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact