फॅशन डिझायनर व्हायचं असेल तर काय करावं लागेल?

image: pinterest

तुम्हाला फॅशनेबल कपडे घालायला आवडतात का? पूर्वी फॅशन म्हटलं की फक्त मोठ्यांचीच फॅशन असायची. पण आता किडसवेअरमध्येही खूप फॅशन आहे. त्यामुळेच लहान मुलं देखील आई बाबांसोबत कपडे घ्यायला जातात तेव्हा फॅशनेबल कपडे घेण्याचा आग्रह धरतात. अर्थात लहान मुलांना काही फॅशन वगैरे कळत नसतं. पण कपड्याचा रंग, डिझाइन नेहमी घालतो त्यापेक्षा वेगळी दिसली की त्यांना ते आपणही घालावं असं वाटत असतं
अनेक मुलांना केवळ फॅशनेबल कपडे घालायला तर आवडतातच सोबतच हे फॅशनेबल कपडे कसे तयार होतात, ते कोण आणि कसे डिझाइन करतात याचीही उत्सुकता असते. तर काही मुलांना आपणही फॅशन डिझायनर व्हावं असं वाटत असतं. फॅशन डिझायनिंग हे देखील अतिशय इंटरेस्टिंग आणि आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात कपडे आणि कपडे सजावटीसाठीची सामग्री यांचा क्रिएटिव्ह आणि नाविन्यपूर्ण वापर केला जातो. आधी कागदावर (आता तर कम्प्युटरवर) कपड्यांचे वेगवेगळे डिझाइन्स बनवले जातात. या डिझाइन्सचे कपडे शिवून त्याचे पॅटर्न बनवले जातात. हे पॅटर्न बनवताना फॅशन डिझायनर्स वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात, संशोधन करतात. कपड्यांचे प्रकार कोणते आहे, बाजारात कोणते ट्रेण्ड सुरु आहे. बाॅलिवूड, हाॅलिवूड, इन्स्टाग्रामवर फॅशनचे कोणकोणते ट्रेण्डस आहेत याचा अभ्यास करुन फॅशन डिझायनर्स कपडे तयार करतात. फॅशन डिझायनर्सना कपडे, फॅशन, ॲक्सेसरीज यातलं बारीक सारीक ज्ञान असतं. ते ज्ञान फॅशन डिझायनिंगमधलं शिक्षण घेऊन ते मिळवतात. सोबत त्यांना या क्षेत्राची आवडही असते. तुम्हालाही जर फॅशन डिझायनिंगची आवड असेल तर फॅशन डिझायनर व्हायला काय करावं लागतं हे माहित असणं आवश्यक आहे.

हेही वाचा!

ॲनिमेटर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? काय शिकावं लागेल!

फॅशन डिझायनर काय काय करतात?

१) कपड्यांच्या डिझाइन्सची स्केचेस काढणे.
२) कपड्यांसाठी उपयुक्त कापड, रंग, पॅटर्न्स निवडणे.
३) कपडे शिवणे, शिवून घेणे.
४) वेगवेगळ्या सीझन्ससाठी वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी, तरुणांसाठी स्त्री आणि पुरुषांसाठी कपडे तयार करणे.

image: pinterest

फॅशन डिझायनर व्हायला काय करावं लागतं?
१) सर्जनशीलता, कल्पकता, चित्रकलेची, स्केचिंगची आवड असावी लागते.
२) फॅशन, स्टायलिंगमध्ये रस असायला हवा. रंगसंगती, कपड्यांचे पोत, डिझाईन्स यांची आवड हवी.
३) बारीक काम करण्याचा संयम, आवड. शिवणकामाची प्राथमिक माहिती आणि कौशल्य हवं
४) कोणत्याही शाखेतून बारावी झाल्यानंतर डिझाईन किंवा फॅशन डिझाईनिंग क्षेत्रातील पदवी घेता येते.
५) फॅशन, स्टायलिंग, टेक्सटाईल क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणही घेता येतं.
६) फॅशन् डिझायनर होण्याची तयारी आपण आत्तापासूनही करु शकतो. त्यासाठी डिझाईन्सच्या स्केचेस करा, त्यासाठी स्वतंत्र वही करु शकता.
७) टेलरिंगचा प्राथमिक कोर्सही करता येईल.
८) वेगवेगळे फॅशन शो, त्यातील डिझाईन्स, कपड्यांचे प्रकार बघा.
९) फॅशन मॅगझिन्स वाचा. त्यातून नवीन ट्रेंड्स, डिझाईन्स बघा. त्यांच्या नोंदी स्वत:कडे ठेवा.
१०) स्वतःसाठी, लहान भावंडांसाठी कपडे शिवण्याचा प्रयोग करुन बघा!

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact