अभ्यासाचा कंटाळा येतो. एवढा अभ्यास करण्याची खरंच गरज असते का?

Image: freepik

अभ्यास नाहीच केला तर काय होईल?

- स्वराज सूर्यवंशी

- अभ्यास नाहीच केला तर बरंच काही होईल. आणि ते सगळंच काही फार चांगलं नसेल. तू शाळेत जातोस ना? तुला शाळा आवडते ना? आवडत असेलच. कारण तिथे तुला खेळायला मैदान आहे. मित्रमैत्रिणी आहेत. शाळेच्या सहली जातात. शाळेत गॅदरिंग असतं. तेव्हा भरपूर मजा करायला मिळते. पण तुला अभ्यास करायचा नसेल तर फक्त मजामस्ती करायला आईबाबा तुला शाळेत पाठवणार नाहीत. ते तुला आवडेल का?

- अभ्यास म्हणजे पुढे जाण्यासाठीचं माध्यम. तू एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जातो ते अभ्यास करुन आणि परीक्षा देऊनच ना? प्रगती करण्यासाठी परीक्षा महत्त्वाच्या असतात. परीक्षेची तयारी अभ्यासाशिवाय शक्यच नाही. पुढे पुढे जाताना प्रत्येक टप्प्यावर परीक्षा द्यावीच लागते. तू शाळेत जातोस, शिकतोस याचा अर्थ तुलाही मोठेपणी प्रगती करायची आहे. पण कोणत्याही क्षेत्रातली प्रगती अभ्यास आणि प्रयत्न केल्याशिवाय होत नाही.

- मोठं झाल्यावर तुला कोण व्हायचंय? तुला कुणीही व्हायचं असेल तर त्यासाठी परीक्षा द्याव्या लागतील. नुसत्या लेखीच नाही, तर लेखी परीक्षा पास केल्यानंतर मुलाखतीला म्हणजे इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागेल. या परीक्षा किचकट असतात. या परीक्षांची तयारी करण्यासाठी जास्त आणि शिस्तशीर अभ्यासाची गरज असते. आणि तू जर आत्तापासूनच अभ्यासाचा कंटाळा केला, अभ्यासच केला नाहीस तर लेखी परीक्षा आणि मुलाखतीत तू कसा पास होशील?

- समजा तुला मोठं झाल्यावर शेती करायची असेल तर शेतीचा अभ्यास करावा लागेल. तुला हवामानाची माहिती असायला हवी. कुठलं पीक कुठल्या वेळी घ्यायचं ते कळायला हवं. म्हणजे त्यासाठीही अभ्यास हवा. किंवा मोबाईल फोनचं दुकान काढायचं असेल तरी त्यासाठी व्यवहारज्ञान हवं. हिशोब करता यायला हवा. म्हणजे तिथेही अभ्यास आलाच.

- नियमित अभ्यास केल्यामुळे तुझी स्मरणशक्ती सुधारेल. तुझ्या मेंदूचा विकास होईल, तुला मन एकाग्र करायला जमेल. या सगळ्याचा मोठं होताना तुला खूप उपयोग होणार आहे. पण तू जर अभ्यासच केला नाही तर यातलं काहीच होणार नाही. त्यामुळे अभ्यास तर तू करायलाच हवा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact