-प्राची पाठक

Image: freepik
प्राणी-पक्षी, किडे-किटक यांचं निरिक्षण करायचं तर टीव्हीवर डिस्कव्हरी किंवा ॲनिमल प्लॅनेट चॅनेलच पाहायला हवं असं नाही. खरंतर आपलं घरही डिस्कव्हरी चॅनेलच तर आहे. पण टीव्ही सोडून आपण घराकडे पाहू तेव्हा कळेल ना? घरात कोणकोणते सजीव येतात, कधी मन लावून पाहिलं आहे? कधी एखादं फुलपाखरू उडून येतं. कधी एखादा पतंग. लगेच आपले डोक्यातले किडे वळवळले पाहिजेत की फुलपाखरू आणि पतंग यात काय फरक असेल बुवा? दिसतात तर दोघे सारखेच. तसेच रंगीत पंख. तसेच उडतात. लाइटच्या सॉकेटमध्ये घर करायला बघणाऱ्या मधमाश्या किंवा माशीसारखे कीटक आलेत कधी तुमच्या घरी? हळूहळू संपूर्ण सॉकेट ते पांढऱ्या रंगाच्या पदार्थाने किंवा चक्क लालसर मातीने भरून टाकतात. कालांतराने त्याला एक छिद्र पडते आणि पिल्लू उडून जाते. कधी लक्षात आलं आहे हे?
हेही वाचा!
बरं, लाइट गेले की आपण दिवे लावतो. त्याच्या भोवती किती कीटक लगेच जमा होतात. कुठून येतात ते? आधी तर काहीच नसतं. मग यांना कळतं कसं, इकडे दिवा लागला आहे, इथे जावं? घरात जरा कुठे गोड पदार्थ सांडला, तर मुंग्या येतात. त्यांना कसं कळतं? कोणतं नेटवर्क वापरतात त्या? मुंग्यांच्या रांगा का असतात. मुंग्या आणि मुंगळे, पावसाळ्यातले कीटक यात काय फरक आहे? मुंग्या काळ्या, लाल अशा काही प्रकारच्या असतात. काळी मुंगी साधी असते आणि लाल मुंगी चावली, तर तासभर खाज आलीच समजा. असं का असेल? कधी शोधली आहेत काया प्रश्नांची उत्तरं ?
सुरु करा घरातलं डिस्कव्हरी चॅनेल
आपण टीव्हीवर कायम डिस्कव्हरी वगैरे चॅनल बघतो. तिथे मोठाले कॅमेरे, दुर्बिणी पाहून अवाक होतो. परंतु, आपल्या घरातच किती सुंदर डिस्कव्हरी चॅनल सुरु आहे, ते मनभरून बघतो का कधी आपण? कधी निवांत बसून त्या मुंग्यांचा मागोवा घ्यायचा. कुठे जातात त्या, कुठून येतात. काय जमा करत असतात? कशा जातात? घरात जाळी जळमटी लागतात ती कोळ्यांमुळे. त्यांचे किती प्रकार आहेत पृथ्वीवर? त्यातले आपल्या घरात किती आहेत? कसे दिसतात ते नेमके? किती पाय आहेत त्यांना? त्यांच्या पायांवर काही रंगीत डिझाइन असतं का? ते विषारी असतात की कसं? एखादी पाल कोळ्याच्या जाळ्यात अडकलेली दिसते का? पाळी भिंतीवर कसं काय चिकटून चालू शकतात? त्या काय खात असतात आपल्या घरात? झुरळं पाहून लगेच पळापळ करण्यापेक्षा बघू तरी झुरळ नेमकं कसं दिसतं. त्याला पाय किती, त्याचे पंखांचे रंग कसे? ते उडतं का? झुरळ रात्रीच का बाहेर निघतात जास्तकरून? काय खात असतील ते आपल्या घरात? त्यांना थेट हिट मारून मारण्यापेक्षा आधी त्यांचे अड्डे कुठे आहेत घरात, त्यात अंडी आहेत का, ती कशी दिसतात, हे बघायची संधी तर घेऊ.

Image: freepik
आयतेच न सांगता घरातच थेट येणारे असे अनेक जीव असतात. ढेकणापासून ते पालीपर्यंत. अन्नाला लागणाऱ्या बुरशीपासून ते नासवणाऱ्या दुधापार्यंत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेणं म्हणजे घरबसल्या निसर्ग सफरच तर आहे!
prachi333@hotmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact