माणसं एकमेकांशी बोलेनाशी का झाली? हा बदल का झाला?

हल्ली लोकांना एकमेकांशी बोलण्यातला रस कमी झाला आहे, हे खरं आहे का?
- सूरज यादव , शांता प्रभू प्रशाला

Image: freepik

 

काळाप्रमाणे माणसं बदलतात. त्यांच्या वागण्या बोलण्याच्या पध्दती बदलतात. नवीन साधनांचा वापर सुरु होतो. त्यातून नवीन सवयी जडतात. संवादाच्या बाबतीत हे असंच झालं आहे. माणसं खरंतर खूप बोलतात. फक्त त्यांची बोलण्याची पद्धत बदलली आहे.
- जगभरात संवाद साधण्याची माध्यमं, तंत्रज्ञान यात मोठा बदल झाला आहे. संवादाच्या माध्यमांचा विकास झाला आहे. या माध्यमांमुळे एकमेकांशी बोलण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्याची,समोरासमोर बसून बोलण्याची गरज कमी झाली आहे. संवादाची माध्यमं विकसित झाल्यामुळे लोकं कायम एकमेकांच्या संपर्कात असतात, एकमेकांशी संवाद साधतात.
- आत्ता एकमेकांना न भेटता, त्यांच्याशी प्रत्यक्ष न बोलता हवी ती कामं होतात, एकमेकांबद्दलचं क्षेमकुशल कळतं. संवादाच्या आधुनिक साधनांनी जास्त वेळ, पैसा खर्च न करता एकमेकांशी तोंडानं न बोलता सतत बोलत राहण्याची सोय केली आहे.
- काळाप्रमाणे व्यक्ती बदलतात, समाज बदलतो. सामाजिक नियमांमध्ये जे बदल झाले आहेत त्यानुसार लोकांना एकमेकांना जाऊन भेटण्यापेक्षा त्यांना इमेल पाठवणे, मेसेजेस पाठवणे सोयीचे वाटू लागले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी आहे. स्वत:साठी वेळ हवा आहे. त्या स्पेसमधे वावरताना लोकं इतरांशी कमी आणि स्वत:शी बोलू लागली आहेत.
- सध्याची जीवनशैली खूप गतिमान झाली आहे. स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे एकमेकांना भेटायला, बोलायला लोकांना पूर्वीचा तुलनेत वेळ कमी मिळू लागला आहे. आत्ता विशिष्ट प्रसंगीच लोकांना एकमेकांना भेटण्यास, गप्पा मारण्यास वेळ मिळतो.
- हातातील स्मार्ट फोन, समाज माध्यमाचा वापर वाढला आहे. घरातील लोकांशी बोलण्यापेक्षा समाज माध्यमावरील अपरिचित व्यक्तींशी आभासात्मक (व्हर्च्युअल) संवाद साधण्याची सवय लोकांना लागली आहे.
- आत्ता जगभरातली माणसं जिथे कुठे असतील तिथून त्यांच्यापासून दूर, परदेशात असलेल्या त्यांच्या प्रिय व्यक्तींशी सहज संवाद साधू शकतात. आपल्याला ज्याच्याशी बोलायचं आहे ती व्यक्ती दूर आहे म्हणून मनातलं काही त्यांना सांगता येत नाही असं अजिबात नाही. एकमेकांमधल्या भौगोलिक अंतरामुळे माणसं भलेही समोरासमोर बसून बोलू शकत नसली तरी आधुनिक संवादाच्या माध्यमातून एकमेकांना भेटून, समोरासमोर बसून जसं बोललं जातं त्याचा अनुभव घेत आहेत.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact