मला समजतंच नाही की, मी आई बाबांचं स्वप्नं पूर्ण करु की स्वत:चं?

Image: freepik

मला समजतंच नाही की, मी आई बाबांचं स्वप्नं पूर्ण करु की स्वत:चं?

- गायत्री जाधव, श्री केशवराज विद्यालय, लातूर

- सर्वच मुलांच्या आई-बाबांची त्यांच्यासाठी स्वप्नं असतात.अपेक्षा असतात.आपल्या मुलाने/मुलीने अमूक काहीतरी व्हावं,तमूक काहीतरी करुन दाखवावं अशी इच्छा असते.आई बाबांप्रमाणेच प्रत्येक मुलाचं स्वत:चं स्वत:साठी काहीतरी स्वप्नं असतं.
- मुलांनी आपलं स्वत:चं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी आई बाबांची मदत आणि मार्गदर्शन घेणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण आपण आपल्याला आईबाबांपेक्षाही जास्त चांगलं ओळखतो. आपल्याला काय आवडतं, काय जमतं, काय अवघड जातं, काय करायला अजिबात आवडत नाही हे चांगलं माहिती असतं. या सर्वांवरचं आपली स्वप्नंही उभी राहतात.
- आपल्याला रस नाही पण केवळ आपल्या आई बाबांचं स्वप्नं पूर्ण करायचं म्हणून ते करायला जाणं म्हणजे स्वत:वर अन्याय करणं आहे. असं केल्यास जे करतो त्यात अपयश येण्याचा धोकाही असतो.शिवाय त्याचा मनावर ताण येतो. आवाक्याच्या बाहेरच्या स्वप्नांमागे धावताना आपलं शरीर आणि मन दोन्ही दमतं.यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो.
- जे अवघड वाटतंय, जे आवडत नाही त्यासाठी प्रयत्न करताना, त्याविषयी विचार करताना आपल्यातली ऊर्जा एवढी खर्च होते की जे आपल्या जमतंय, आवडतंय तेही पुढे करावंसं वाटत नाही. अभ्यासातलं लक्ष उडतं.त्याचा परिणाम शैक्षणिक प्रगतीवर होतो.
- आईबाबांना आपल्याबद्दल काय वाटतं ते समजून घ्यावं, त्याचा आदर जरुर करावा. त्यातलं आपल्याला काय शक्य आहे, थोडे प्रयत्न केले तर आपल्याला काय जमेल याचा विचार मात्र अवश्य करावा. आई बाबांची स्वप्न पूर्ण करणं आपल्या क्षमतेबाहेरचे वाटल्यास सरळ आपल्याला जे आवडतं ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यावर लक्ष केंद्रित करावं.
- आपल्या आवडीनिवडीबद्दल, आपल्याला भविष्यात जे व्हायचं त्याबद्दल आईबाबांशी बोलत राहायला हवं. संवाद साधल्याने आईबाबांनाही मुलांच्या मनातलं कळतं. ज्यामुळे आपल्या मुलांना त्रास होईल अशा गोष्टी मुलांवर लादण्याची चूक आई-बाबा कधीच करणार नाही.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact