शब्दाचं शेवटचं अक्षर घेऊन खेळा एक वेगळी आणि मजेदार अंताक्षरी!

उज्जीचे खेळ

- उज्ज्वला बर्वे

Image: freepik

शाळेच्या ट्रीपमध्ये त्यांनी काय काय केलं ते सांगताना शांभवी म्हणाली “उज्जी, आम्ही नावांची अंताक्षरी खेळलो.” मायरा आहे तीनच वर्षांची, पण भारी चुणचुणीत. तिला काही माहीत नसलं की लगेच विचारते. तिने विचारलं, “अंताक्षरी म्हणजे काय?' - प्रणव म्हणाला, “अगं, म्हणजे भेंड्या!”
मायराला वाटलं तो नेहमीसारखी तिची चेष्टा करतोय. “उज्जी, बघ ना. तो पुन्हा मला चिडवतोय” असं म्हणून ती रडायला आली तेव्हा मी म्हटलं, “अग, खरंच भेंड्या नावाचा खेळ असतो.”
खेळ शब्द ऐकताक्षणी सगळे 'आपण खेळू, आपण खेळू' म्हणून नाचायला लागले. आता अंताक्षरी काय, सगळ्यांनाच तर खेळता येते! त्यात नवीन काय करता येईल? - मी असा विचार करतच होता तेवढ्यात रियांश म्हणाला, “उज्जी सांग ना.. तुझ्या आयडिया भारी असतात.”

 

हेही वाचा!

रिवाट होकली गांचला ळेखतो! ही वेगळी भाषा नव्हे शब्दांचा खेळ आहे!

मग लढवावीच लागली आयडिया. मी मुलांना म्हणाले, “आपण थोडी वेगळी आणि जास्त भारी अंताक्षरी खेळू- आधीच्या शब्दाचं शेवटचं अक्षर घ्यायचं पण आपला शब्द सांगताना त्या अक्षराला ‘ओ’ लावलेलाच शब्द सांगायचा. समजा माझा शब्द आहे ‘खोली’. त्याचं शेवटचं अक्षर कुठलं? - ल. त्या अक्शराला ओ लावला की होणार लो. मग पुढचा शब्द सांगायचा 'लो' पासून सुरु होणारा. सांगा बरं असा शब्द...?'
' लोड' - मुलं म्हणाली. आता ड ला ओ लावून पुढचा शब्द कुठला बरं? - प्रणव लगेच ओरडला ' उज्जी, लोड!’
आता ‘ड’वरून पुढचा शब्द कुठला?
“डोकं!” - पुन्हा प्रणव ओरडला. इतर मुलं त्याच्यावर ओरडायच्या आधी मी म्हणाले, “चला, आता ओळीने खेळू या सगळे मिळून'
मग मुलं एकामागून एक सुरुच झाली आणि नव्या अंताक्षरीची माळ फटाफट फुटायला लागली.
पोपट - टोपली - लोकर - रोज - जोर - रोप - पोळी
इथे येऊन सगळे थांबले. आता या ळ चं काय करायचं? - तर ळ ऐवजी ल घ्यायचं. तसंच करतात नेहमी. आणि ण च्या ऐवजी न..
बघताबघता शंभरेक शब्द झाले. जाता जाता सुमेश म्हणाला, “उज्जी, असेच ‘अ’चे, ‘आ’चे शब्द निघतील. उद्या तसे खेळू.”

ujjwalabarve@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact