घरात नुसता गोंधळ असतो. एवढ्या आवाजात अभ्यास कसा होईल?

डाॅ. श्रुती पानसे

image : mensxp

अभ्यास करताना आमच्या घरामध्ये अजिबात शांतता नसते आणि त्यामुळे अभ्यासात मन एकाग्र होऊ शकत नाही. 

अनेक मुलांची समस्या आहे की घरामध्ये शांतता नसते. घरामध्ये मोठी माणसं एकमेकांशी भांडत असतात. टीव्हीचे मोठमोठाले आवाज चालू असतात. शेजारच्या घरांमध्ये टीव्हीचे किंवा त्यांच्या बोलण्याचे आवाज येत असतात. 

 

हेही वाचा!

पुरवणी घेतली नाही तर कमी मार्क्स पडतात का?

तुम्ही काय कराल?

  • घरातल्या सर्व माणसांना एकत्र करून एकाच वेळेला जर सांगितलं की मला परीक्षेपर्यंत घरामध्ये शांतता हवी आहे. तर कदाचित घरची माणसं या अभ्यासाचं गांभीर्य समजून घेतील आणि घरामध्ये शांतता निर्माण करतील. 
  • हे आपण घरच्यांच्या संदर्भात करू शकू पण बाहेरचे जे आवाज येतात त्याच्यावर आपलं नियंत्रण असू शकत नाही. आपली एकाग्रता वाढवावी लागेलच याशिवाय सहनशक्ती सुद्धा वाढवावी लागेल दुसरा कोणताही पर्याय नाही. 
  • जेव्हा घरात जास्त आवाज असतील तेव्हा लेखन किंवा गणितं सोडवणं  आणि शांतता असेल तेव्हा वाचन अशा प्रकारे काही कोणत्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे हे ठरवता येईल. 
  • घरातली माणसं रात्री झोपतील तेव्हा किंवा पहाटे उठून अभ्यास करता येतो का हे बघावं. 
  • - घर छोटं असतं आणि आपला अभ्यास तिथे होत नाही, म्हणून अनेक मुलं वेगवेगळे उपाय शोधून काढतात. अनेक मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधून काढलेले आहेत. ते  उपाय इथे सुचवत आहे. यातला आपल्याला जो शक्य आहे तो उपाय आपण करू शकतो किंवा याचा आधार घेऊन आपण अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगळ्या कल्पना सुचू शकतात. 
  •  जेव्हा आपलं घर लहान असतं त्यावेळेला घराजवळच्या एखाद्या बागेमध्ये पुस्तक वाचन, लेखन साहित्य घेऊन जाणं , तिथे जाऊन  लिहिणं  असं आपण करू शकतो. 
  •  तीन-चार मित्र-मैत्रिणी जमून एखाद्याच्या घरामध्ये अभ्यास करू शकतो . 

शाळेतल्या शिक्षकांना विनंती करून शाळेची एखादी खोली, शाळेचं आवार हे अभ्यासासाठी मिळवू शकतो. असे काही उपाय करता येतील. 

अभ्यास बागेत जाऊन करणं किंवा  एकत्र अभ्यास करणं यांचा अर्थ आपण मजा करण्यासाठी एकत्र भेटत नाही आहोत, याचं भान असावं. आपलं लक्ष हे पूर्णपणे अभ्यासाकडेच पाहिजे. ही गप्पा मारण्याची वेळ नाही असं स्वत:ला बजावलं तरी पुरे आहे. जर त्यावेळेला आपल्याशी कोणी बोलायला आलं, गप्पा मारायला आलं तर दोन वाक्य बोलावं. मात्र अभ्यासावरनं इतर कोणामुळेही लक्ष ढळू नये याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल..  कारण परीक्षा आपली आहे!

लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.

shruti.akrodcourses@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 9112050500
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact