डाॅ. श्रुती पानसे

बाकी सगळ्यांनी पुरवणी घेतली, पण मला लागली नाही. मला कमी मार्क्स मिळतील का?
परीक्षा सुरू झाली की साधारण तासाभरानंतर ज्यांना दिलेला पेपर पुरत नाही ती मुलं पुरवणी घेतात. त्यामुळे बाकीच्या मुलांना वाटतं की , आपणही पुरवणी घ्यायला पाहिजे.
वास्तविक पेपर पुरला नाही हेच एकमेव कारण पुरवणी घेण्यामागे असायला पाहिजे. अन्य कोणतंही नाही.
कदाचित काही मुलांची अक्षरं मोठी असल्यामुळे त्यांना पेपर पुरत नसेल. किंवा आकृत्या मोठ्या आकाराच्या काढल्यामुळे जागा संपत असेल. अशीही काही कारणं असू शकतात. तसंच पुरवणी लावणाऱ्याने खरोखर अभ्यास खूप जास्त केला, त्याला / तिला सर्व प्रश्नांची छान उत्तरं येत होती, म्हणून पुरवणी लागली असंही होऊ शकतं.
मात्र त्याने घेतली म्हणून आपणही पुरवणी घ्यायची आणि त्यासाठी अचानक अक्षर मोठं मोठं काढायचं. मध्ये खूप जागा मोकळी सोडून लिहायचं आणि कसाबसा तो पेपर संपवून पुरवणी घ्यायची, यात काही अर्थ नाही.
हेही वाचा!
परीक्षेत वेळ पुरण्यासाठी अभ्यास कसा करायचा?
ज्याने जास्त पुरवण्या लावल्या त्याला शंभरापैकी शंभर मार्क असं झालेलं कधी पाहिलं आहे का? याचं कारण आपलं अक्षर, आपण मध्ये मुद्दाम जागा सोडली आहे , हे सर्व पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना समजतं. फक्त पुरवणी लावली म्हणून जास्त मार्क दिले असं शिक्षक कधीच करत नाहीत.
त्यापेक्षा अशा गोष्टींकडे लक्ष द्यावं.
- आपला पेपर सुटसुटीत असावा.
- अक्षर सुबक असावं.
- आकृत्या प्रमाणात असाव्यात.
- खूप जास्त खाडाखोड नसावी.
- समजा एखादं उत्तर किंवा एखादं पूर्ण गणित चुकलं तर पेन्सिलीने त्यावर एकाच काट मारून खाली पुन्हा एकदा तितक्याच व्यवस्थितपणे ते सोडवावं.
- जागा भरण्यासाठी आकृत्या काढू नयेत. आवश्यक तिथे आणि प्रमाणबद्ध आकारात नीटनेटक्या आकृत्या काढाव्यात.
- संपूर्ण पेपर लिहून झाल्यावर महत्वाच्या मुद्यांखाली पेन्सिलीने रेघा माराव्यात, मात्र हे ही तितका वेळ हाताशी असेल तर. योग्य नियोजन केलं तर यासाठी नक्कीच वेळ पुरतो. आपण जे उत्तर लिहिलं आहे ते मुद्देसूद आहे, त्यातले महत्वाचं जे वाटतं त्याखाली रेघ मारली म्हणजे आपल्याला विषय समाजाला आहे हे शिक्षकांच्या लक्षात येत. एवढं पुरेसं आहे.
- आपली उत्तरं खूप त्रोटक नकोत आणि त्यात भारंभार पसाराही नको. तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा यायला नकोत.
अशा काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. तर तुम्ही केला आहे त्या अभ्यासाच्या प्रमाणात आणि सोडवलेल्या पेपर मध्ये जे बरोबर उत्तरं आहेत त्यानुसार तुम्हाला मार्क मिळतील. पुरवणी लावून किंवा न लावून मार्क कमी किंवा जास्त होत नाहीत हे नक्की.
लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.
shruti.akrodcourses@gmail.com


