मुक्ता काळे

Image:.freepik
काय दोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे की तुम्ही सगळे आनंदातच असणार. कारण आता सुट्टी सुरू आहे ना! किती मोकळा वेळ आहे ना तुमच्याकडे. खरंतर आता तुम्हाला माझ्या सहवासात राहण्यासाठी जास्त वेळही मिळतो आहे. पण तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. मी कोण असा प्रश्न पडला तुम्हाला? खरंतर तुम्ही मला चांगले ओळखता. अहो मी पुस्तक. तुमच्या सर्वांचं लाडकं पुस्तक... तुमचा जवळचा मित्र.
मी तुमचा अगदी बालपणापासूनचा मित्र. अगदी तुम्हाला वाचता येत नव्हतं तेव्हापासूनचा. आईने, आज्जीने, बाबाने तुम्हाला पोटातल्या गोष्टी वाचून दाखवल्या. तुम्हाला किती आवडायच्या ना त्या गोष्टी. नंतर तुम्ही शाळेत जायला लागला तेव्हा मी तुम्हाला शाळेतही भेटलो. मला खूप आवडतं तुमच्या सोबत राहायला, खेळायला, बागडायला.
हेही वाचा!
शाळा सुरु झाल्यानंतर तुमचे आई बाबा मला दुकानातून खास तुमच्यासाठी घेवून यायचे. मी नवीन असायचो तेव्हा माझ्या कोऱ्या करकरीत अंगाला सुंदर वास यायचा. मला नाकाजवळ घेवून तुम्ही मला हुंगायचात आणि माझा वास घेऊनच वाचनाला सुरुवात करायचात.
बालवाडी, छोटा शिशुपर्यंत मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, कविता शिकवत गेलो. पण जसजसे तुम्ही मोठे होत जाताय तसतसे मी वेगवेगळ्या विषयात तुम्हाला भेटू लागलो आहे. मग आपली मातृभाषा मराठी असू देत, सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी किंवा व्यवहारिक भाषा इंग्रजी. मग ते भलं मोठं गणित, भूमितीचं प्रमेय, विज्ञानातल्या गमती जमती असो किंवा इतिहास. तुम्ही माझ्या सहवासात रमता. मलाही तुमचा स्पर्श झाला की आनंद होतो.

Image: pinterest
पण माझी एक तक्रार आहे!
एक सांगू, मलाही भावना आहेत. त्या कधी कधी दुखावल्या जातात. जेव्हा तुम्ही मला निष्काळजीपणाने फेकून देता, कसंही हाताळता. माझ्यावर रेघोट्या ओढता तेव्हा मात्र मला तुमचा खूपच राग येतो. आणि मी फुगून बसतो. पण तुम्ही अभ्यास करताना थकलेला असता आणि अलगद माझ्यावर डोकं ठेवता तेव्हा मला तुमच्या बद्दल प्रेम, आपुलकी, माया वाटते.
पण सध्या तुम्ही माझ्या सहवासात फारसे रमत नाही. फक्त जागतिक वाचक दिनानिमित्त सोशल मीडियावर माझा फक्त फोटो ठेवता, पण तुम्ही मला वाचत नाही, ते आयताकृती डबडं हातात घेऊन बसता. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडे बघायला वेळच नसतो.
आता माझी जागा किंडलने घेतली आहे. पण तुम्ही बाबांकडे ते हजारो रुपयांचं किंडल घेण्यासाठी मागे लागता, त्यापेक्षा पुस्तकं का नाही विकत घेत? आणि एक सांगू, लेखक हा माझ्या आई सारखा आहे. त्याने मला जन्म दिला. त्यांच्या लेखणीतून मी तयार झालो. आता तुम्ही मला वाचलंच नाहीत तर हा जन्म कसा काय सार्थकी लागेल. त्यामुळे मला वाचा, वाचत राहा! वाचाल तर वाचाल! सुटीमध्ये निवांत बसून पुस्तक वाचण्याची मजा वेगळीच असते. एकदा सुटी गेली की हातात अभ्यासाची पुस्तकं येतात आणि मग आपल्या आवडीची गोष्टीची पुस्तकं वाचण्यास वेळच मिळत नाही. मग आता सुटीचा मोका आहे तर वाचनाचा चौका मारायचा का?
( मुक्ता पुस्तक प्रेमी विद्यार्थिनी आहे.)
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact