आज उपलब्ध असलेल्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विचार केला तर सौर ऊर्जेचा पर्याय हा सर्वोत्तम पर्यायांमध्ये मोडतो. यामागची प्रमुख कारणं म्हणजे यातून प्रदूषणविरहित आणि तरीही मुबलक ऊर्जा मिळू शकते. पण तरीही ऊर्जेचा महत्वाचा स्रोत म्हणून जागा मिळवण्यासाठी या ऊर्जास्रोताला काही अडथळे ओलांडावे लागणार आहेत.
आव्हान १ : सतत ऊर्जा उपलब्ध होणं
सौरऊर्जा कितीही मुबलक उपलब्ध असली तरीही ती सतत मिळत नाही तर थांबून थांबून मिळते ही त्यातील मोठी अडचण आहे. सामान्यतः सोलर पॅनल्स दिवसाकाठी ४ ते ५ तास ऊर्जानिर्मिती करू शकतात. आकडेवारी बघितली असता असं लक्षात येतं, की ही ऊर्जा अशी अधून मधून मिळत असल्यामुळे रात्री आणि काही विशिष्ठ ऋतूंमध्ये ती ऊर्जा वापरण्याला अडचणी येतात. अत्याधुनिक बॅटरीसकट इतर ऊर्जा साठवण्याचे पर्याय अजूनही विकसित होत आहेत. त्यामुळे त्यासाठी आपल्याला जास्त चांगल्या तंत्रज्ञानाची गरज आहे.
हेही वाचा!
पृथ्वीचे झालेले नुकसान भरुन काढतील असे ३ उपाय आहेत. ते कोणते?
आव्हान २ : किंमतीचे गणित
सोलर पॅनल्स बसवण्याचा सुरुवातीचा खर्च ही त्यातली एक मोठीच अडचण आहे. पण बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर त्या किंमती हळू हळू खाली येतायत. अमेरिकेत २०१० साली एका घरगुती सौर यंत्रणेची किंमत सुमारे ७.५० डॉलर्स (रु. ६२४) प्रति वॉट एवढी होती. नॅशनल रिन्यूएबल एनर्जी लॅबोरेटरीच्या आकडेवारीसुनार ही किंमत २०२० साली २.८१ डॉलर्स (रु. २३४) प्रति वॉट इतकी कमी झाली. सरकारी मदत आणि सबसिडी यामुळेदेखील जास्त लोक सौर ऊर्जा वापरू शकतात.

आव्हान ३ : जागेची तरतूद
मोठया सौर ऊर्जेच्या यंत्रणांना बरीच जागा लागते, त्यामुळे जागेची उपलब्धता हीही एक अडचण असू शकते. पण आधीच अस्तित्वात असलेल्या बांधकामावर सोलर पॅनल्स बसवणं यासारख्या नवीन कल्पना वापरून हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. शिवाय दूरवर असलेल्या सौर ऊर्जेच्या यंत्रणेपासून शहरापर्यंत वीज वाहून आणणं हेही खर्चिक असू शकतं. त्यामुळे सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट ग्रिड टेक्नॉलॉजी आणि सुधारित पॉवर ट्रान्समिशन हे गरजेचे आहेत.
आव्हान ४ : कचरा व्यवस्थापन
सोलर पॅनल्सची निर्मिती करतांना आणि त्यांची विल्हेवाट लावतांना पुनर्वापर करण्याच्या प्रक्रिया वापरल्या जातात. मात्र पुनर्वापर करण्याच्या किंमती वाढत्या आहेत आणि सध्याच्या टिपिकल क्रिस्टलाईन सिलिकॉन पॅनेल्समध्ये जवळजवळ ९० टक्के भाग हे पुनर्वापर करण्यासारखे असतात.
या सगळ्या अडचणी जरी असल्या, तरी तंत्रज्ञानात सतत होणाऱ्या सुधारणेमुळे सौर ऊर्जा निर्मिती ही चांगल्या स्वच्छ भविष्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


