
मला कुरकुरे, काॅर्नपाॅप्स, बबली हे पदार्थ आई बाबा खाऊच देत नाही. नको नको म्हणतात असं का?
-ऋजुता गोसावी, इयत्ता ५ वी,चंपावती इंग्लिश स्कूल, बीड
- तुला काय खायला आवडतं? असा प्रश्न विचारला तर तू काय उत्तर देशील? कुठे बाहेर गेल्यावर तुझ्या आवडीचे पदार्थ मागव म्हटल्यावर तू काय घेतेस खायला? भाजी पोळी किंवा आई-बाबा म्हणतात ते पौष्टिक पदार्थ तू खातेस का? शरीरच्या वाढीसाठी, मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेले घटक ज्या पदार्थातून मिळतात त्या पदार्थांना तू कायम नाकच मुरडत असते का? या प्रश्नांच्या उत्तरातच तू आता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे.
- तुला जे खायला आवडतं ते शरीरासाठी पोषक नसल्याने आई बाबा अशा पदार्थांना नाहीच म्हणतात. पण तू जर नेहमी शिस्तीत दोन्ही वेळेसचं जेवण करत असशील, ताटातले पदार्थ किचकिच न करता आवडीने खात असशील तर कधीतरी तू मागितलेले कुरकुरे, काॅर्नपाॅप्स हे पदार्थ खायला आईबाबा परवानगी देतीलही. पण हे पदार्थ तू रोजच मागत असशील तर आई बाबा त्याला नाहीच म्हणणार. ते का नाही म्हणतात याचं उत्तरही आहे माझ्याकडे.
- विज्ञानाच्या पुस्तकात शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक पदार्थ कुठले याची माहिती दिली असेल. तू ती वाचली आहेस का? आपल्या शरीराची वाढ छान व्हायला हवी असेल तर कार्बोहायड्रेड्स, प्रोटीन्स, फायबर्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स अशा अनेक गोष्टी आपल्याला आवश्यक असतात. हे सर्व घटक तुझ्या आवडीच्या खाऊमधून मिळतात का?
- तुझ्या आवडीचं खाऊचं पाकिट परत घेशील तेव्हा त्याच्या मागच्या बाजूला एक तक्ता असेल. तो नक्की वाच. आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटकातले किती घटक आहेत, त्यांचं प्रमाण किती हे तुला त्यातून दिसेल.
- आपल्या शरीरासाठी महत्त्वाच्या असलेल्या किती गोष्टी त्या खाऊमधून मिळतात हे एकदा तपासून बघितलं की आईबाबा तुला तो खाऊ खाऊ नकोस असं का सांगतात ते तुला आपोआपच कळेल.
- हिरव्या पालेभाज्या, फळं, रोज घरी केलेला ताजा स्वयंपाक, दूध, दही, लोणी, तूप, इडली, डोसे असे आंबवलेले पदार्थ हे तू नियमितपणे खाल्लेस तर तुझी रोगप्रतिकारशक्ती वाढेल. तुझी उंची वाढेल. तू सारखी आजारी पडणार नाहीस. तुझे डोळेही चांगले राहतील.
- या सगळ्याचा चांगला परिणाम तुझ्या अभ्यासावर होईल. तुला खेळायलाही भरपूर ऊर्जा मिळेल. तुला जो खाऊ खायला खूप आवडतो असं तू सांगते आहेस तो खाऊन मात्र तुला फारसा उपयोग होणार नाही. म्हणून आईबाबा तुला तो खाऊ खायला नाही म्हणतात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


