रोजच्या जगण्यातून जन्माला आलेला राक्षस आता आपल्यालाच छळतोय!

- शिवान दर्डा

Image: ecotextile

१९६० सालापासून आजपर्यंत प्लॅस्टिकच्या पॅकिंगमध्ये १२० टक्के वाढ झालेली आहे. इतकंच नाही, तर येत्या वीस वर्षांत ही वाढ २० टक्के असेल असा अंदाज आहे. मोठ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचे काही काळानंतर बारीक बारीक तुकडे होतात, सिंथेटिक कपडे फाटले की त्यांचेही बारीकबारीक तुकडे होतात, अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये मायक्रोबीड्स असतात, आणि यासारखे अनेक घटक मिळून हा मायक्रोप्लॅस्टिक्सचा कचरा निर्माण होतो. या मायक्रोप्लॅस्टिक्सचे तुकडे अक्षरशः ५ मिलीमीटर किंवा त्याहूनही लहान असतात. पण कितीही लहान तुकडे झाले तरी शेवटी ते प्लॅस्टिक असतं, त्यामुळे त्याचं विघटन होऊन ते मातीत मिसळत नाही. हा कचरा वर्षानुवर्षं पर्यावरणात तसाच राहतो आणि तो प्राण्यांच्या आणि माणसांच्याही अन्नात मिसळतो.

हेही वाचा!

मायक्रोप्लॅस्टिकचे दूरगामी परिणाम

मायक्रोप्लॅस्टिकचे वन्यजीवांवर अनेक प्रकारे परिणाम होतात. मायक्रोप्लॅस्टिकमुळे पर्यावरणात घातक पदार्थ सोडले जाऊ शकतात. इतकंच नाही, तर हे तुकडे अन्नाबरोबर प्राण्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या अन्न पचनाला अडथळा निर्माण करू शकतात. अन्नसाखळीमध्ये या प्रकारे मायक्रोप्लॅस्टिक साचत गेलं की त्याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होतो. शिवाय त्याने वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग आणि विषाणूंचीही वाढ होऊ शकते.

Image: Secondsguru

तुम्हाला हे माहितीये का?

एकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्याने जवळजवळ ७,००,००० मायक्रोप्लॅस्टिकचे धागे वातावरणात सोडले जाऊ शकतात. आपल्या पृथ्वीवर सगळी घरं आणि कारखाने मिळून दर आठवड्याला जवळजवळ साडे अठरा कोटी वेळा कपडे धुतले जातात. म्हणजे दर आठवड्याला फक्त सिंथेटिक कपड्यांचा किती कचरा पर्यावरणात सोडला जात असेल याचा तुम्हीच विचार करा.

मायक्रोप्लॅस्टिकचा कचरा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो?

१. प्लॅस्टिकचा वापर कमी करू शकतो.

२. प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट अधिक योग्य पद्धतीने लावू शकतो.

३. शक्यतो नैसर्गिक धागे आणि इतर वस्तू वापरण्याचा प्रयत्न करू शकतो.

४. ज्या कंपन्या वस्तू बनवतांना पर्यावरणाचा चांगला विचार करतात त्यांच्या वस्तू विकत घेऊ शकतो.

५. प्लॅस्टिकला शक्य तिथे पर्याय निर्माण करण्यासाठी सरकारवर दबाव टाकू शकतो.

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact