येथे आमचं भविष्य सुरक्षित नाही म्हणत १६ मुलामुलींनी राज्यावरच भरला खटला!

Image: lemonde.fr

मोन्टाना हे अमरिकेतील एक राज्य. डोंगररांगा. सपाट प्रदेश, ग्लेशियर नॅशनल पार्क, तसेच कॅनडापर्यंत विस्तारलेलं वाळवंट असं वैविध्यानं नटलेलं हे राज्य आहे. या मोन्टाना राज्याची चर्चा सध्या जगभर सुरु आहे, ती या राज्यातील ६ ते २२ वयोगटातील १६ मुलामुलींमुळे . या मुला मुलींच्या ग्रूपने काय केलं माहितीये, त्यांनी ' आमचं भविष्य धोक्यात आहे म्हणत या राज्यातील सरकारवरच खटला भरला.

प्रदूषणामुळे मोन्टाना राज्य पर्यावरणाचं रक्षण करु शकत नाही. पर्यावरण धोक्यात आल्यानं आमचं जगणं आणि भविष्यही धोक्यात आलं आहे , असं या मुलामुलींचं म्हणणं आहे. १९७२ मध्ये मोन्टाना राज्याची घटना अस्तित्वात आली. या घटनेत असं स्पष्टपणे लिहिलं आहे की येथील लोकांना ' स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा' हक्क आहे. मोन्टाना राज्यातील प्रदूषणामुळे आपला हा हक्क डावलला जात आहे आणि आपलं सुरक्षित जगण्याचं भविष्यही धोक्यात आलं आहे. राज्य घटनेने घालून दिलेला नियमच पाळत नसल्याने या राज्यातील तरुण मुला मुलींनी मोन्टाना राज्यावर म्हणजेच हे राज्य चालवणाऱ्या शासन व्यवस्थेवर आरोप करत न्याय मागण्यासाठी आणि आरोग्यदायी पर्यावरणात सुरक्षित जगण्याचा आपला हक्क मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. 

 हेही वाचा!

काय झालं मोन्टानात?    

मोन्टाना राज्यात कोळसा या जिवाश्म इंधनाचा वापर होत आहे. मोन्टाना हे अमेरिकेतील कोळसा उत्पादनात अग्रेसर असलेलं राज्य आहे. तसेच येथे नैसर्गिक वायू निर्मितीही मोठ्या प्रमाणात केली जाते. कोळसा आणि नैसर्गिक वायू  यामुळे येथील लोकांना हवामान बदलाच्या धोकादायक परिणामांना सामोरं जावं लागत आहे. येथील हवा अशुध्द झाली आहे. पाणी अस्वच्छ झालं आहे.  येथील लोकांना प्यायला शुध्द पाणी मिळत नाहीये. अस्वच्छ पाणी प्रश्नामुळे येथील मासेमारीही धोक्यात आली आहे,  सतत दुष्काळ पडतो आहे, पाऊस कमी पडत आहे.. अशी या मुलामुलींची तक्रार आहे. त्यावर न्याय मिळवण्यासाठी ते मोन्टाना विरुध्द कोर्टात गेले आहेत.  हवामान बदल हा केवळ एकट्या मोन्टाना राज्याचा प्रश्न नाहीये, ही जागतिक समस्या आहे, हे येथील मुला मुलींना माहीत आहे. पण मोन्टाना राज्य जे घटनेत नमूद केलं आहे त्याच्याविरुध्द वागत असल्याने  ही मुलं मोन्टाना विरुध्द कोर्टात गेली.  हवामान बदलाबाबतत मोन्टाना शासनानं आपली जबाबदारी उचलावी हा त्यांचा आग्रह आहे. लोकांना आरोग्यदायी पर्यावरणात सुरक्षित जगण्याचा हक्क आहे, हे घटनेतच नमूद असल्याकारणानं ही केस कोर्टानं दाखल करुन घेतली आणि त्यावर सुनावणी घेण्यासही सुरुवात केली आहे.

 हेही वाचा!

कोर्टात काय घडतंय?

पण मोन्टानाचे राज्यकर्ते मात्र म्हणतात की हवामान बदलासाठी येथील तरुण मुलं मुली या राज्याला दोषी धरु शकत नाही. ही जागतिक समस्या आहे. हवामान बदलास कारणीभूत ठरेल असं काहीही या राज्याने केलेलं नाही, अशी येथील राज्यकर्त्यांनी कोर्टात भूमिका घेतली आहे.

वकिलांनी मोन्टाना विरुध्द खटला दाखल करणाऱ्या तरुण मुला मुलींना पहिले त्यांचं म्हणणं मांडू दिलं आहे. हवामान बदलामुळे मोन्टाना मध्ये राहाताना त्यांना कोणकोणत्या समस्यांना , आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे, हे सांगण्यास प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर त्यांनी हवामान बदलाचे अभ्यासक तज्ज्ञ यांना बोलावून माणसासाठी उपयोगी पडणारा कोळशाचा वापर हा कसा हवामान बदलास कारणीभूत ठरतो, हे समजून घेतलं आहे. मोन्टाना सरकारतर्फे आपण हवामान बदलाच्या परिणामांसाठी कसे कारणीभूत नाही हे सांग्ण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आलं होतं. आता सगळ्यांचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे.

Image: newsday

हा निकाल जर मुलांच्या बाजूने लागला तर हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश न्यायालय माॅन्टेना शासनाला देईल. पर्यावरण सुरक्षित राखण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचा आग्रह  कोर्ट मोन्टाना सरकारला करेल. आणि मुलं जर हा खटला जिंकले तर अशी अनेक प्रकरणं कोर्टासमोर येतील. आपण जेथे राहातो तेथील पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही. आणि शासन जर ही जबाबदारी योग्यरितीने पार पाडत नसेल तर आपण शासनाला जाब विचारला पाहिजे हा धडा या मोन्टाना राज्यातील १६ तरुण मुला मुलींनी घालून दिला आहे. 

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact