एका हातात स्पिनर आणि एका हातात टॅबलेट कम्प्युटर घेऊन नवीन बार्बी आली!

Image: thetoyinsider

बाहुलीशी खेळायला आवडतं का तुम्हाला? त्यातही ती जर बार्बी डाॅल असेल तर खेळण्यासोबतच ती आपल्याला आपल्या खेळण्यांच्या संग्रहात हवीच असते. बार्बी बाहुली मुलींसोबतच मुलांनाही फार आवडते. तिच्याशी खेळताना मुलांना स्वत:ची गोष्ट तयार करायला आवडते. वेगवेगळ्या रोलमधल्या बार्बीकडे पाहून मुलांनाही तिच्यासरखं व्हावंसं वाटतं. तिच्याशी खेळता खेळता मुलांमध्ये नवीन काही तयार करण्याची इच्छा निर्माण होते. बार्बीमुळे मुलं एकमेकांशी जोडली जातात. एकमेकांशी संवाद साधतात. इतर अनेक बाहुल्यांप्रमाणे बार्बीची बाहुली असली तरी या बाहुलीत असणाऱ्या काही वैशिष्ट्यांमुळे बार्बी बाहुली इतर बाहुल्यांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते. बार्बी ही मुलांना फक्त खेळण्यातली बाहुलीच वाटते असं नाही तर आपल्या आजूबाजूला जेवढ्या प्रकारच्या व्यक्ती दिसतात तेवढ्यांहं प्रतिबिंब बार्बीत दिसत असल्यामुळे ही बाहुली मुलांना आपल्यातलीच कोणी एक असल्यासारखी वाटते.

हेही वाचा!

पत्र पाठवणं आता बंद! डेन्मार्कने असा निर्णय का घेतला असेल?

मॅटल ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ती खेळण्या तयार करते. बार्बी डाॅल ही या कंपनीचीच निर्मिती. या कंपनीने एकाच प्रकारची बार्बी तयार न करता वेगवेगळ्या उंची, रंग, वजन असलेल्या बार्बी तयार केल्या. कानात श्रवण यंत्र लावलेली बार्बी, कृत्रिम पाय असलेली बार्बी पाहून मुलांना ही बाहुली केवळ काल्पनिक गोष्ट वाटली नाही. त्यांना ती परकी न वाटता आपली वाटली. अशा वेगवेगळ्या बार्बी समाजातल्या प्रत्येक घटकाचं प्रतिनिधित्व करतात. आता तर 'ऑटिस्टिक बार्बी'ही आली आहे.
ऑटिझम ही मेंदूची एक अवस्था आहे. आज अमेरिकेत 31 लोकांपैकी 1 ऑटिस्टिक व्यक्ती आहे. ऑटिझम काय आहे? हे समाजातल्या इतरांना समजावे तसेच ऑटिझम असलेल्यांना आपलं खेळकर रुप बघण्याचा आनंद मिळण्यासाठी ही ऑटिझम असलेली बार्बी तयार केली आहे

Image: dezeen

ऑटिस्टिक बार्बी कशी आहे?
* मॅटल कंपनीने 'ऑटिस्टिक सेल्फ ॲडव्होकसी नेटवर्क'या संस्थेशी दीड वर्ष काम केलं. ही संस्था ऑटिस्टिक माणसं चालवतात. ऑटिस्टिक माणसांचा आवाज, म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था करते. ऑटिस्टिक ही स्थिती काही डोळ्यांना दिसणारी नाही. पण तरीही मेटल कंपनीने तयार केलेल्या ऑटिस्टिक बार्बीमध्ये काही वैशिष्ट्ये मुद्दाम घातली आहेत. ऑटिस्टिक बार्बीचे डोळे समोर बघणारे नसून ते बाजूला बघणारे ठेवलेले आहेत. कारण ऑटिस्टिक व्यक्ती इतरांकडे थेट डोळ्याला डोळे भिडवून बघण्याचं टाळतात.
* या बार्बीने ढीले कपडे घातलेले आहे. ऑटिस्टिक व्यक्तींना घट्ट कपडे घालायला आवडत नाही हे त्यामागचं कारण.
* बार्बीच्या हाताचा कोपरा, मनगट वाकलेले आहे. त्याचं कारण ऑटिस्टिक व्यक्तींना सतत हाताची हालचाल करायची असते.
* ऑटिस्टिक बार्बीमध्ये काही नवीन गोष्टींचा मुद्दाम अंतर्भाव केला आहे. बार्बीच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर एक क्लिज्ञा आहे. ही क्लिप म्हणजे स्पिनर. ते हाताने फिरवायचं. याचा फायदा लक्ष केंद्रित होण्यासाठी ह्तो.
* या बार्बीला हेडफोन्स आहेत. ऑटिस्टिक व्यक्तींना आजूबाजूचा आवाज नकोसा होतो. तो टाळण्यासाठी ते हेडफोन्स लावतात.
* बार्बीच्या उजव्या हातात टॅबलेट कम्प्युटर आहे. त्यात विशिष्ट शब्दांच्या खुणा आहेत. ऑटिस्टिक व्यक्तींना बोलताना अवघड जातं. त्यांना काय म्हणायचं आहे हे ते या टॅबलेटवरील खुणांद्वारे सांगू शकतात.
ऑटिस्टिक व्यक्तींना आपलं असं खेळकर रुप बार्बीमध्ये पाहायला मिळत आहे. मॅटल कंपनीने प्रसिध ऑटिस्टिक व्यक्तींना घेऊन ही नवी बार्बी बाजारात आणली. त्यात मॅडिसन मारिला आहेत. ज्या नेटफ्लिक्सवर ऑटिस्टिक व्यकींसाठी शो चालवतात. इंटरनेटवर व्हिडीओ तयार करणारे प्रेशिअस आणि मिको मिराज ही आई मुलीची जोडी यांचीही मदत ही ऑटिस्टिक बार्बी तयार करताना घेतली गेली. या बार्बीने ऑटिस्टिक व्यक्ती आणि समाज यांना जोडणारा एक पूल तयार केला आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact